मुंबई : काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असे सांगतानाच काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के.पाटील यांनी मंगळवारी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत विधाने करणारे त्याचा घटकही नाहीत इतक्या महत्वाच्या राजकीय आघाडीच्या कारभारात नाक खुपसणे शहाणपणाचे नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
एच.के.पाटील यांच्या उपस्थित आज मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, नसीम खान, अमरजित मनहास यांच्या सोबतच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी आगामी पालिका निवडणुकांसदर्भातही चर्चा झाली.
सोमवारी पदग्रहण सभारंभातही एच.के.पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी संजय राऊत यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता. राजकीय व्यक्तीच्या विधानाला ते उत्तर होते, असे सांगतानाच थेट शिवसेनेवर भाष्य करण्याचे त्यांनी यावेळीटाळले. मुंबईत पक्ष वाढीसाठी मिशन मोडवर काम केले जाणार असून शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पदयात्रांच्या माध्यमातून २२७ वाँर्डातील कार्यकर्ते आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहचणार असल्याचे पाटील म्हणाले.