मुंबई : अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकही आमने-सामने आले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 'उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना घरी बसून कारभार करत होते, त्यामुळे आम्हाला जास्त बोलायला लावू नका,' असा इशारा दिला होता. मुंडे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत आज उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे.
"धनंजय मुंडेंनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं की हेच माझं घर आहे. तिथून तरी त्यांनी कारभार करावा," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी केलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना हा टोला लगावल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरेंचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल, पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- जबाबदारी घेतली आहे, तर जबाबदारी पार पाडा. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा.
- पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या, माझ्या बळीराजाला न्याय द्या.
- ‘प्रधानमंत्री फसल योजना‘ हा घोटाळा आहे; पारदर्शकता असेल तर विम्याचे पैसे गेले कुठे?
- दुःखात खचून जाऊ नका, शिवसेना नेहमी तुमच्यासोबत आहे.
- या सरकारने सगळंच विकायला काढलंय, तुम्ही अवयव विकण्याचा अविचार मनात आणू नका!
- बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या.
- दुसऱ्याकडे धुणीभांडी करायला जाणारे राज्यकारभारासाठी नालायक.
- हे सरकार सगळंच विकंतयं.
- पंचनाम्याचा खेळ थांबवा, सरसकट मदत द्या