मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनाआमदारांचे संख्याबळ घटले असून शिवसेनेच्या तीन आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडूनही शिवसेना आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. औरंगाबादच्या कन्नड विधानसभेचे आमदार हर्षवर्धन जाधव, लोहा-कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि विदर्भातील वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांचे विधानसभेतील संख्याबळ 63 वरुन 60 वर आले आहे. मात्र मनसेच्या एकमेव आमदाराने काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही संख्या 61 झाली आहे.
मराठा आरक्षणाला पाठिंबा देत कन्नड येथील शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधिमंडळात वारंवार चर्चा करुनही मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले नाही, यासाठी सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी केली होती.
नांदेडमधील लोहा-कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड महानगरपालिका निवडणुकीवेळी भाजपाला पाठिंबा देत शिवसेनेशी बंडखोरी केली होती. त्यानंतर चिखलीकर यांनी शिवसेना आमदारकीचा राजीनामा दिला. सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात प्रताप पाटील चिखलीकर युतीकडून निवडणूक लढवत आहेत.
विदर्भातले शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभेचे आमदार बाळू धानोरकर यांनीही शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र ऐन निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना-भाजपाने दिलजमाई करत युती जाहीर केली. युतीमध्ये ही जागा भाजपाच्या वाट्याला असून याठिकाणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे भाजपाचे उमेदवार आहेत. त्यामुळे नाराज होऊन बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.