पृथ्वी शॉला हक्काचं घर द्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 11:54 AM2018-02-06T11:54:59+5:302018-02-06T11:55:46+5:30

अंडर-19 भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करत चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरणा-या पृथ्वी शॉला मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी शिवसेना आमदाराने पुढाकार घेतला आहे

Shivsena MLA demands to five shelter to Prithvi Shaw in Mumbai | पृथ्वी शॉला हक्काचं घर द्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पृथ्वी शॉला हक्काचं घर द्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next

मुंबई - अंडर-19 भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करत चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरणा-या पृथ्वी शॉला मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी शिवसेना आमदाराने पुढाकार घेतला आहे.  जगभरात भारताची मान उंचावणा-या पृथ्वी शॉला मुंबईत हक्काचं घर मिळावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे. यासाठीच आज ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

पृथ्वी शॉ आधी विरारला राहत होता. 2013 ला हॅरीस शिल्डमध्ये 500 धावा फटकावल्यानंतर आमदार पोतनीस यांनी त्याची व्यवस्था वाकोल्याच्या एसआरए कॉलनीत केली. पण सध्या त्याच्याकडे कायमस्वरुपी निवासस्थान नसल्याने त्याने केलेली कामगिरी पाहता त्याला मुंबईत हक्काचं घर मिळालं पाहिजे अशी मागणी संजय पोतनीस यांनी केली आहे. 

विरार ते वर्ल्ड चॅम्पियन! जग जिंकणाऱ्या पृथ्वी शॉचा प्रेरणादायी प्रवास 
पृथ्वी शॉच्या नाट्यमय प्रवासाची सुरुवात होते ती मुंबईजवळ असलेल्या विरार नावाच्या शहरातून. 9 नोव्हेंबर 1999 या दिवशी शॉ माता-पित्याच्या पोटी पृथ्वीचा जन्म झाला. प्रत्येक आई-वडिलांप्रमाणेच शॉ दाम्पत्यही आपल्या लेकराला मोठं करण्याची स्वप्न पाहत होते. पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. पृथ्वी चार वर्षांचा असतानाच त्याच्या डोक्यावरील मातृछत्र हरपलं. आईच्या मायेला पोरका झालेल्या पृथ्वीला वडील पंकज शॉ यांनी खस्ता खात वाढवलं. प्रसंगी आईचं प्रेम देतानाच एक बाप म्हणून आपलं कर्तव्यही पार पाडलं. कपड्यांचा व्यवसाय करतानाच पृथ्वीच्या  क्रिकेटवर त्यांनी लक्ष दिला. छोटा पृथ्वी क्रिकेटची वजनदार किट सांभाळत लोकलमध्ये धक्के खात विरार ते एमआयजी क्लब हा प्रवास रोज करायचा. अंगात नैसर्गिक प्रतिभा असल्याने क्रिकेट्या मैदानात त्याला कधी अडचण आलीच नाही. मात्र घरची परिस्थिती परीक्षा घेत होती. 

याचदरम्यान पंकज शॉ यांनी सांताक्रुझमध्ये एक भाड्याचं घर मिळवलं. या कामी काही सहृदयी मंडळींची त्यांना मदत झाली. छोट्या पृथ्वीचे शिक्षण मुंबईतील नामांकित अशा रिझवी स्प्रिंगफिल्ड या शाळेत सुरू झाले. प्रवासाची दगदग थांबल्याने क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणंही त्याला शक्य झालं. दरम्यान, पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारी एक घटना घडली. हॅरिस शिल्ड या मुंबईतील शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने 546 धावांची विक्रमी खेळी केली. छोट्या पृथ्वीचे नाव मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात चर्चेत आले. आजी-माजी क्रिकेटपटूंचे  लक्ष वेधले गेले. या खेळीनंतर पृथ्वीने कधीही मागे वळून पाहिले नाही. इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी त्याला स्कॉलरशिप मिळाली. तिथे क्लिथोपर्स क्लबकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली. 

लवकरच पृथ्वीकडे मुंबईच्या 16 वर्षांखालील संघाचे कर्णधारपद आले. तिथेही पृथ्वीने आपली प्रतिभा दाखवली. शालेय आणि वयोगट क्रिकेटमध्ये चमक दाखवल्याने पृथ्वीचा प्रथमश्रेणी क्रिकेटमधील प्रवेश अगदी सहजपणे झाला. सन 2016-17 च्या हंगामासाठी पृथ्वीची निवड मुंबईच्या रणजी संघात झाली. मग पृथ्वीनेही तामिळनाडूविरुद्ध पदार्पणातच शतकी खेळी करून आपली निवड सार्थ ठरवली. पुढे ओदिशा आणि आंध्र प्रदेशविरुद्धही शानदार शतके ठोकत त्याने सर्वांची वाहवा मिळवली. पुढे दुलिप करंडकातही पदार्पणातच शतकी खेळी करण्याचा पराक्रम त्याने केला. त्याबरोबरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रणजी आणि दुलिप करंडकात पदार्पणातच शतकी खेळी करण्याचा विक्रम करणारा मास्टर ब्लास्टर सचिननंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला. 

दमदार कामगिरीमुळे साहजिकपणे पृथ्वीची निवड भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या कर्णधारपदी झाली. तिथे भारतीय क्रिकेटमधील तंत्रशुद्ध फलंदाजीचा ज्ञानकोष म्हणावा असा राहुल द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेत असल्याने त्याचाही फायदा पृथ्वीला झाला. न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात एक फलंदाज आणि कुशल कप्तान म्हणून पृथ्वीने छाप पाडली. विश्वचषकातील भारताच्या या युवा क्रिकेटपटूंची कामगिरी हा आता इतिहास बनलाय. तर पृथ्वी हा मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील स्टार झालाय. पण ही तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. 

Web Title: Shivsena MLA demands to five shelter to Prithvi Shaw in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.