मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यांना शासनानं तातडीनं आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. काल दहिसर पूर्व येथील एन. जी. पार्क येथील तीन घरं जमीनदोस्त झाली. याशिवाय मुंबईच्या इतर भागांमध्ये राहणाऱ्या लोकांचंही पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. गेल्यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसातील अपघातग्रस्त नागरिकांना शासनानं 5000 रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्याप्रमाणे शासनाने यंदा 10000 रुपयांची आर्थिक मदत तातडीनं करावी, अशी मागणी सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची अनेक चाळण झाली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होईपर्यंत वाहन चालकांकडून टोल आकारणी करू नये, जेणे करून वाहतूक कोंडी दूर होऊन वाहन चालकांना आर्थिक दिलासा मिळेल अशी मागणीदेखील मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी दिली.
पावसातील अपघातग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत द्या; आमदार प्रकाश सुर्वेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 9:28 AM