मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिंदेसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला आहे. वायकर यांनी मतदारसंघाची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे.
वर्षावर मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या बैठका झाल्या होत्या. यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असून, त्यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार वायकर त्यांच्या जोगेश्वरी पूर्व श्यामनगर तलावाजवळील सेवालय कार्यालयात, तर कधी मातोश्री क्लबमध्ये रोज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, भेटीगाठी घेत आहेत. बुधवारी ८ ते १० मान्यवर डॉक्टरांची बैठकदेखील मातोश्रीत त्यांनी घेतली होती. येत्या दोन- तीन दिवसांत शिंदेसेनेतून उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रचार सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.