मुंबई - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालाबाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं यासाठी शिवसेना आमदारांनी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी अखंड महाराष्ट्राला जोडण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्राला एकत्र जोडून ठेवणे हे त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळेच या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्यात यावं असं शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी म्हटलं आहे.
आमचा समृद्धी महामार्गाला विरोध नव्हता. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा हिच आमची मागणी असल्याचं सुनिल प्रभू यांनी सांगितलं. तसेच समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग करत असून एकनाथ शिंदे या खात्याचे मंत्री आहेत. याआधी एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिलं होतं. त्यानंतर आज शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची विनंती केली आहे.