मुंबई : शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीने हल्ला केल्याची घटना रात्री उशिरा घडली. या हल्ल्यातून तुकाराम काते थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरमध्ये शुक्रवारी रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास आमदार तुकाराम काते यांच्यावर अज्ञातांकडून तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तुकाराम काते थोडक्यात बचावले असून त्यांचा सुरक्षा रक्षक पोलीस आणि दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मेट्रोच्या कारशेडचे काम रात्रंदिवस सुरु होते. यामुळे स्थानिकांना त्रास होत होता. याबाबत काम तात्काळ थांबवावे यासाठी तुकाराम काते यांनी आंदोलन केले होते. तरीसुद्धा काम सुरु असल्याने ते कामाच्या ठिकाणी गेले होते. यावेळी त्यांनी कंत्राटदारांना काम थांबविण्यास सांगितले आणि ते माघारी परतले. त्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा हल्ला मेट्रोच्या कंत्राटदारांकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.