महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर ! 'एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला', आंदोलनात शिवसैनिकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 07:48 AM2017-09-23T07:48:46+5:302017-09-23T14:06:29+5:30

मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. शनिवारपासून ( 23 सप्टेंबर ) शिवसेनेचे मुंबईत विभागवार मोर्चे निघणार आहेत.

shivsena morcha against inflation in mumbai | महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर ! 'एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला', आंदोलनात शिवसैनिकांची घोषणाबाजी

महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर ! 'एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला', आंदोलनात शिवसैनिकांची घोषणाबाजी

googlenewsNext

मुंबई, दि. 23 - मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे मुंबईतील 12 ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई याला शिवसेना विरोध दर्शवत आहे. ''नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय'', अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून देण्यात येत आहे. ''एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला'', अशा घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी अक्षरशः टोक गाठल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

दक्षिण मुंबई 

शिवसेना विभाग क्रमांक 11 - महागाईविरोधात निदर्शने करणा-या शिवसैनिकांना ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली.  अटक करण्यात आलेल्यांमध्ये आमदार नीलम गो-हे , आमदार अजय चौधरी, आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर , माजी महापौर स्नेहल आंबेकर, अरविंद भोसले, माजी आमदार दगडू सकपाळ यांचा समावेश आहे. 

जोगेश्वरी 

महागाईविरोधात शिवसेना विभाग क्रमांक 3 तर्फे जोगेश्वरी रेल्वे पूर्व स्थानकाबाहेर जोरदार निदर्शनं सुरू आहेत. महिलांनी थाळी वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खासदार गजानन कीर्तिकर, आमदार व विभागप्रमुह सुनील प्रभू, महिला विभाग संघटक व नगरसेविका साधना माने यांच्यासह जोगेश्वरी, गोरेगाव व दिंडोशीतील सर्व नगरसेवकांचा आंदोलनात समावेश आहे.

''दुर्देवानं ही वेळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केली आहे'', असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते. शिवसेनेने यापूर्वीही शेतकरी कर्जमाफीवरुन राज्यभरात मोर्चे काढून निदर्शनं केली होती. आता शिवसेना पेट्रोल दरवाढ आणि महागाई मुद्यावरुन सरकारला टार्गेट करण्यात येत आहे.  

बोरिवलीत शिवसेनेनं काढली सरकारची प्रेतयात्रा
शिवसेना विभाग क्रमांक 1च्या महिलांनी 'महागाईच्या भस्मासुराची' प्रेतयात्रा काढून आंदोलन केले. या आंदोलनात आमदार प्रकाश सुर्वे, विभागप्रमुख प्रकाश कारकर, प्रभारी विभागप्रमुख विलास पोतनीस, महिला विभागसंघटक रश्मी भोसले यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पार्क, बोरीवली पूर्व येथे उग्र आंदोलन करण्यात आले. पेट्रोल दरवाढी विरोधात युवासैनिक व शिवसैनिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने सायकल, बैलगाड्या, हातगाड्या याची रॅली काढून तीव्र निषेध केला. काही वेळानंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले.  मोठ्या संख्येनं शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. 

 


दरम्यान यवतमाळमध्येही शिवसेनेने महागाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. वाढती महागाई, भारनियमन, दुष्काळी परिस्थिती, नापिकी या प्रमुख बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने आर्णी, महागाव, पुसद, दारव्हा, उमरखेड, बाभूळगाव, वणी आदी तालुक्यात आंदोलन केले व याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
वीज वितरण कंपनीने जिल्ह्यात 16 तासांचे भारनियमन लादले आहे. यामुळे सण, उत्सव अंधारात साजरे करावे लागणार आहे. शेतामधील उभे पिकही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे भारनियमन तत्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेने केली. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही महिन्याला वाढविले जात आहेत. पेट्रोलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आल्याचा आरोप शिवसेनेने केला. सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी शिवसेनेने केली. 

पुसद/उमरखेड/महागाव
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर दोन महिन्यात 20 रुपयाच्यावर वाढविले. या महागाईविरोधात पुसद, महागाव आणि उमरखेड शिवसेनेनं मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.  शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ऑनलाईनची अट रद्द करावी, पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात ठेवावे आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.  
 

Web Title: shivsena morcha against inflation in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.