दूधवाल्याकडे भाजपाच्या महाराष्ट्र अन् दिल्लीतील बड्या नेत्याचा पैसा, लवकरच पर्दाफाश करणार; राऊतांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 05:43 PM2022-03-08T17:43:33+5:302022-03-08T17:44:33+5:30
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सक्तवसुली संचालनालय आणि भाजपावर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी यावेळी एका दूधवाल्याचा उल्लेख केला.
मुंबई-
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सक्तवसुली संचालनालय आणि भाजपावर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी यावेळी एका दूधवाल्याचा उल्लेख केला. राऊतांनी याआधीच्या पत्रकार परिषदेतही याच दूधवाल्याचा उल्लेख केला होता. "सुमीत कुमार नरवरच्या नावाचा उल्लेख मी मागे केला होता. बुलंद शहरातील या दूध विकणाऱ्या सामान्य माणासाची प्रॉपर्टी चार पाच वर्षात ८ हजार कोटींची कशी झाली?", असं सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत यामागे भाजपा नेत्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
"सुमीत कुमार नरवर याआधी नोएडामध्ये राहत होता. आता तो मलबार हिलमध्ये राहतो. त्याला राहायला साधं घरही नव्हतं. मग ईडीनं नेमका कोणता चष्मा लावला आहे. जर आमच्याकडेही त्याच चष्म्यातून पाहा. मी तुम्हाला त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे देतो. दिल्ली आणि महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा पैसा त्याच्याकडे आहे ही माहिती तुम्हाला देतो. माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे. पैसा कुणाचा आहे? त्याला कशी कामं मिळत होती. माझ्याकडे सर्व माहिती आहे. ही भानामती सांगणार आहे. लवकरच याबाबतचा मोठा गौप्यस्फोट मी करणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.
आम्हालाही तेव्हा अटक होईल- राऊत
"ईडीचे अधिकारी कसं वसुली एजंट प्रमाणं काम करत आहेत याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. ही सर्व भानामती लवकरच सांगणार आहे. त्यानंतर आमच्यावरही धाडी पडतील. आम्हालाही तुम्ही अटक करा. पण तुमचे घोटाळे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही", असं थेट आव्हान संजय राऊत यांनी यावेळी दिलं.
ईडी अधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर कोट्यवधी ट्रान्सफर
ईडीच्या अधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर अनेक कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाले असून त्याचे पुरावे सर्वांना देणार असल्याचं राऊत म्हणाले. "ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली वसुली देशातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जितेंद्र नवलानी यांच्या अकाऊंटवर कोट्यवधी रुपये पाठवले गेले आहेत. अविनाश भोसले यांच्या कंपनीकडून नवलानी यांच्याखात्यावर सुरुवातीला १० कोटी रुपये आणि जेव्हा भोसले यांच्या कंपन्यांची चौकशी सुरू झाली तेव्हा आणखी १६ कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत. आम्ही आतापर्यंत आयकर आणि ईडीला ५० नावं पाठवली. मात्र हे त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. मी एक खासदार असूनही तक्रारींची दखल घेतली जात नाही. संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच सर्वाधिक धाडी का?", असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला.