मुंबईः महाराष्ट्रात भाजपावर दबाव तयार करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेनेनं भाजपावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेनं कौल दिला असला तरीही दोघेही एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. दोन्ही पक्षांनी दबावाचं राजकारण सुरू ठेवलं आहे.शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची स्वतंत्ररीत्या भेट घेतली आहे. शिवसेना, भाजपाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीतले दोन्ही मोठे पक्ष राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी घेत एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत आहेत.लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेचं समान वाटप व्हावं, यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना, भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपाला इशारा दिला आहे. भाजपा आम्हाला दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवू शकत नाही. भाजपानं आमच्यासोबत करार केलेला आहे. त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. ते आम्हाला आश्वासन देऊन मागे हटू शकत नाही, अन्यथा आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करू. 50-50 फॉर्म्युल्यावर संजय राऊतांनी भाजपाला काढलेल्या या चिमट्यानं आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सत्तेसाठी चढाओढ दिसत आहे.
...अन्यथा आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करू; 50-50 फॉर्म्युल्यावर संजय राऊतांचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 9:29 AM