मुंबई - राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यावर ईडीनं कारवाई करुन अटक केली. त्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेनेच्या नेत्यावर लक्ष केले आहे. केंद्रीय आयकर विभागाने मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली आहे. यामुळे शिवसेना नेते चांगलेच खवळले आहेत. खासदार संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे.
संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आमचे गळे आवरण्याचा प्रयत्न करा परंतु आमच्या तोंडातून सत्यच निघेल. राजकीय फायद्यासाठी तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करायचा. चुकीचे आरोप करायचे. कॅबिनेट मंत्र्याला अटक करायची आणि नंतर तुम्ही आंदोलने देखील करायची. त्यामुळे आमच्याकडे मुख्यमंत्र्यांना देखील अधिकार आहेत की कोणाचा राजीनामा मंजूर करायचा आणि कुणाचा राजीनामा फेटाळायचा राजकारण आम्ही देखील करू असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणुका आहेत. महिनाभरात त्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या शिपायांवर सुद्धा रेड टाकतील. २०२४ पर्यंत हे आम्हाला आणि महाराष्ट्राला देखील सहन करायचं आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब यांना देखील सहन करायचं आहे ते २०२४ नंतर बघू. आदित्य ठाकरे यांना उत्तर प्रदेशात प्रचंड प्रतिसाद मिळाला तुमची लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात त्यामुळे गंगा जास्त मैली झालेली आहे. नाझी फौजा या क्रूर होत्या आणि त्या एका हुकूमशहाचा आदेश मानत होत्या. त्यांच्या मालकांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्या जुलूम करत होत्या मला वाटतं देशांमध्ये यापेक्षा वेगळं वातावरण नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.
यशवंत जाधव यांच्या घरावर धाड
मागील ५ वर्षापासून यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केल्यानं शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे
काय आहे प्रकरण?
२०११-१२ मध्ये उदय महावर नावाच्या व्यक्तीनं प्रधान डिलर्स नावाची कंपनी बनवली होती. त्यात पैसे जमवले त्यानंतर ही कंपनी जाधव कुटुंबाला विकली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात जवळपास ७.५ कोटी संपत्ती असल्याची माहिती देण्यात आली होती. ज्यात २.७४ कोटींची स्थावर मालमत्ता होती. तर आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. ज्यात १.७२ कोटींची स्थावर मालमत्ता होती. यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत