'नारायण राणेंना उद्या पंतप्रधान बनवलं तरी...'; शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:47 PM2021-07-08T18:47:55+5:302021-07-08T18:50:50+5:30
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना मिळालेल्या मंत्रिपदावरुन खोचक टोला लगावला.
भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी आज केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर कोकणात राणे समर्थकांनी जल्लोष केला. नारायण राणे यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना जोरदार टोला लगावला आहे. "नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा मग त्यांना उद्या देशाचं पंतप्रधान बनवलं तरी कोकणातून शिवसेनेला हटवणं हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही", असं विनायक राऊत म्हणाले.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...
महाराष्ट्राला मिळालेल्या मंत्रिपदांवरुनही राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. "एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ चार मंत्रिपदं मिळतात हेच मोठं दु:खं आहे. नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान केलं तरीही कोकणातून शिवसेनेला हटविण्याची ऐपत कुणामध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नातं तोडण्याचं काम कुणी करू शकणार नाही. प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या कार्यक्षम मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर जातो, याचं दु:ख फार मोठं आहे", असंही विनायक राऊत म्हणाले.