'लाव रे तो व्हिडिओ'! नारायण राणे-सोमय्यांचे जुने 'साटेलोटे' दाखविले; राजन तेलींचेही नाव घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 07:00 PM2022-02-16T19:00:32+5:302022-02-16T19:02:10+5:30

शिवसेना आणि भाजपामधील वादानं आता नव वळण घेतलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या पत्रकार परिषदेच्या मालिकाच सुरू झाल्या आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं.

shivsena mp vinayak raut shows video of bjp narayan rane and kirit somaiya | 'लाव रे तो व्हिडिओ'! नारायण राणे-सोमय्यांचे जुने 'साटेलोटे' दाखविले; राजन तेलींचेही नाव घेतले

'लाव रे तो व्हिडिओ'! नारायण राणे-सोमय्यांचे जुने 'साटेलोटे' दाखविले; राजन तेलींचेही नाव घेतले

Next

मुंबई-

शिवसेना आणि भाजपामधील वादानं आता नव वळण घेतलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या पत्रकार परिषदेच्या मालिकाच सुरू झाल्या आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं. आता राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणेंच्या टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेकडून 'लाव रे तो व्हिडिओ'चा आधार घेत थेट किरट सोमय्यांचे व्हिडिओच पत्रकार परिषदेत दाखवले आहेत. एकेकाळी किरीट सोमय्यांनी नारायण राणेंच्या नावावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना घाबरुनच नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. 

विनायक राऊत यांनी यावेळी किरीट सोमय्यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. त्यात किरीट सोमय्या यांनी सध्याचे भाजपाचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांच्यावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडीची चौकशी मागे लागेल म्हणूनच नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा खळबळजनक आरोप विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोटारडा असा उल्लेख नारायण राणे यांनी केल्याचा आणखी एक व्हिडिओ सादर केला. नरेंद्र मोदी हा एनडीएचा खोटारडा उमेदवार असल्याचं नारायण राणे म्हणाले होते असा व्हिडिओ विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. 

नितेश राणेंनी सोमय्यांवर केले होते आरोप
विनायक राऊत यांनी आणखी एका व्हिडिओत नितेश राणे हे किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत असल्याचा एक व्हिडिओ देखील दाखवला. "किरीट सोमय्या हे मराठी भाषेच्या विरोधात असून त्यांनी मुंबईतील शाळांमध्ये मराठीच्या सक्तीला विरोध केला. तसेच भाजपाच्या काही नेत्यांनी दक्षिण मुंबई ही शाकाहारी झोन जाहीर करा अशी मागणी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी त्यावेळी केला होता", असं विनायक राऊतांनी व्हिडिओ पुरावे सादर करत जोरदार हल्लाबोल केला. तसंच किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर केलेल्या आरोपांचं काय झालं याबाबत ईडीकडे चौकशी करणार असल्याचंही विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं. इतकंच नव्हे. तर राजन तेलींनी नितेश राणेंवर केलेल्या आरोपाचा एक व्हिडिओ दाखवून नारायण राणेंचं असेच व्हिडिओ यापुढील काळात सर्वांसमोर आणणार असल्याचं विनायक राऊत म्हणाले. 
 

Web Title: shivsena mp vinayak raut shows video of bjp narayan rane and kirit somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.