"खोक्याचे अन् धोक्याचे वर्ष... मावळत्या वर्षात देशात लोकशाहीचे हत्याकांड"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 08:27 AM2022-12-31T08:27:28+5:302022-12-31T13:58:10+5:30

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रातील भाजप सरकारने हुकूमशाह पद्धतीने सरकारी यंत्रणांचा वापर करत विरोधी पक्षांना संपवण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे

"Shivsena on Eknath Shinde and bjp ... the massacre of democracy in the country in the last year" | "खोक्याचे अन् धोक्याचे वर्ष... मावळत्या वर्षात देशात लोकशाहीचे हत्याकांड"

"खोक्याचे अन् धोक्याचे वर्ष... मावळत्या वर्षात देशात लोकशाहीचे हत्याकांड"

googlenewsNext

मुंबई - कोरोनाच्या संकटाला मागे सोडत २०२२ च्या नव्या वर्षाने सुरुवात केली. तत्पूर्वी २०२१ च्या वर्षभरात कोरोनाच्या लाटांमुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले होते. आता बस्स झालं, नको तो कोरोना आणि नको ते लॉकडाऊन अशीच प्रत्येकाची भावना होती. अखेर, २०२२ चं वर्ष पुनश्च हरिओम म्हणत उजाडलं अन् सर्वांनाच दिलासा मिळाला. मात्र, अनेक घटनांनी यंदाचं वर्ष गाजलं. आंतररराष्ट्रीय पातळीवर विचार केल्यास रशिया-युक्रेन युद्धाची ठिणगी याच वर्षात पडली. तर, महाराष्ट्रात हे वर्ष गाजले ते शिवसेनेतील बंडखोरीमुळे. एकनाथ शिंदेंनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ लक्षवेधी ठरली. याच मावळत्या वर्षाचा आढावा घेताना शिवसेनेनं केंद्र आणि राज्यातील भाजप सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रातील भाजप सरकारने हुकूमशाह पद्धतीने सरकारी यंत्रणांचा वापर करत विरोधी पक्षांना संपवण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'मावळत्या वर्षाचा धांडोळा घेताना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओढवलेले सर्वात मोठे संकट म्हणजे रशिया व युक्रेनचे युद्ध. जगभरातील अनेक देशांना या युद्धाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दुष्परिणाम भोगावे लागले. हिंदुस्थानपुरता विचार करायचा तर मावळते वर्ष देशातील लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले. पाशवी बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेला, सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना भयभीत करण्याचे सत्रच गेले वर्षभर चालवले, असे म्हणत सरत्या वर्षात लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात शिवसेनेनं केला आहे.  

चीनची घुसकोरी, महागाई, बेकारी अन् ढासळेली अर्थव्यवस्था

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा मीडिया एकतर सरकारने बगलबच्च्यांकरवी खरेदी केला किंवा धाकदपटशा दाखवून मुख्य प्रवाहातील साऱ्याच प्रसारमाध्यमांची तोंडे बंद केली. सरकारविरुद्ध बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सरकारी यंत्रणांचा वाटेल तसा गैरवापर करून तुरुंगात डांबले, पण उशिरा का होईना वर्षाखेरीस न्यायालयात या सरकारी मुस्कटदाबीचे थोबाड फुटले. विरोधी पक्षात असलेले सारेच नेते भ्रष्ट आणि तीच मंडळी ईडी वा सीबीआयच्या धाकाने सत्ताधाऱ्यांच्या छावणीत दाखल झाली की, धुऊन-पुसून स्वच्छ, अशी भलतीच व्याख्या सरत्या वर्षात सरकारने रूढ केली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे नको तेवढे व्यक्तिस्तोम माजवले जात असतानाच चीनने हिंदुस्थानात केलेल्या घुसखोरीपासून महागाई, बेकारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली अपमानास्पद घसरण, हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच. 

धोक्याचे अन् खोक्याचे वर्ष

एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण. मावळत्या वर्षातील सरकारी दहशतवादाचा हा उच्छाद लोकशाहीचे तमाम स्तंभ उघडय़ा डोळय़ांनी पाहात राहिले. नव्या वर्षात तरी आंधळेपणाचा बुरखा पांघरलेली ही पट्टी सुटेल काय?

Web Title: "Shivsena on Eknath Shinde and bjp ... the massacre of democracy in the country in the last year"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.