Shivsena : एक घाव दोन तुकडे, लवकरच राजकारणात येणार तेजस उद्धव ठाकरे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 04:19 PM2021-08-07T16:19:28+5:302021-08-07T16:39:13+5:30
Shivsena : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या जाहिरातीमुळे तेजस यांच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात नार्वेकर यांनी दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी केली आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रत्यक्षपणे कधीही राजकारणात आले नव्हते. मात्र, राजकारणात येताच ते मुख्यमंत्री बनले, त्यानंतर आमदार झाले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतून आमदार बनल्यानंतर आदित्य ठाकरे यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. म्हणजेच ठाकरे कुटुंबीयांची तिसरी पिढी राजकारणात उतरली असून तेजस ठाकरे हे अद्याप राजकारणापासून दूर आहेत. मात्र, वाढदिवसाच्या निमित्ताने तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या जाहिरातीमुळे तेजस यांच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात नार्वेकर यांनी दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी केली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. त्यातच, सध्या युवासेनेच्या अध्यक्षपदाचीही चर्चा सुरू असून तेजस ठाकरेंना हे पद दिलं जाऊ शकतं, अशी देखील चर्चा आहे. तसेच, एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे... अशा मथळ्यानेही त्यांनी जाहिरात दिली आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) August 7, 2021
तेजस यांना ठाकरे कुटुंबियांचे व्हिव्हियन रिचर्ड्स संबोधत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ही जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. या शुभेच्छांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिवियन रिचर्ड्स हे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर असून त्यांची फलंदाजी जगभरात चर्चेत होती. जगभरातील गोलंदांचा कर्दनकाळ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे व्हिवियन रिचर्ड्स हे नाव नसून मोठ्या स्थानाचं विशेषण संबोधलं जातं. म्हणूनच, नार्वेकर यांची जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसून येण्याची दाट शक्यता आहे.
बाळासाहेबांनी सांगितला होता तेजसचा आक्रमक बाणा
माझी जशी तोडफोड सेना आहे, तशी त्याची तोडफोड सेनाच असेल, असं बाळासाहेब ठाकरे तेजसबद्दल म्हणाले होते. भाजपा नेत्याने शिवसेना भवन पाडण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेलाही पूर्वीचा आक्रमक बाणा दाखवावा लागणार आहे. त्यादृष्टीने पक्षबांधणी करायची असेल तर युवासेनेच्या शिलेदारांमध्ये जोश भरण्याची क्षमता तेजसमध्ये असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
तेजस ठाकरे हेही निसर्गप्रेमी आहेत, त्यासोबतच त्यांना वन्य जीवांवर संशोधनाची आवड आहे. यापूर्वी त्यांनी खेकडा या जीवाची नवीन जात शोधून काढली आहे. तसेच, शिवसेनेतील आक्रमकपणा हा तेजस ठाकरे यांच्याकडे असल्याने जरी बदलत्या शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे पर्याय असले तरी सेनेच्या मूळ ढाच्याला साजेसे नेतृत्व म्हणून तेजस ठाकरे यांची राजकारणातील एन्ट्री यामुळे मृदू स्वभावाचे आदित्य आणि आक्रमक स्वभावाचे तेजस या दोघांचा शिवसेनेला आगामी चांगला वापर करता येईल, त्याचा सेनेला फायदाच होईल, असेही बोलले जात आहे.