मुंबई - भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आपण नाही तर एकनाथ शिंदेमुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आणि अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या अडीच वर्षांपासून याचसाठी त्यांचा अट्टाहास होता का? असाही प्रश्न अनेकांना पडला. पण, जे घडले ते आपण साऱ्यांनीच पाहिले, ऐकले. आता, आणखी एक ट्विस्ट महाराष्ट्राला पहायला मिळाला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याचे निर्देश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिले आहेत. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीसांचं कौतुक केलं.
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी जंग जंग पछाडलेले. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने निकाल लागताच आम्हाला मुख्यमंत्री पद देण्याचा भाजपाने शब्द दिलेला याचे भांडवल करून मविआसोबत सत्ता स्थापन केली. त्यापूर्वी फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येत पहाटेलाच शपथविधी पार पाडला. मात्र, ते सरकार दीड दिवसांतच कोसळलं. त्यानंतर, शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर स्वत: देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठीची घोषणा केली. त्यामुळे, देवेंद्र यांनी एक बेंचमार्क सेट केलाय, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करताना जनतेला हा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लाँग टर्म गोल पाहून घेतला असेल, असे पंकजा यांनी म्हटलं. या निर्णयामुळे भाजपच्या गटात नाराजी आहे का, यासंदर्भात विचारले असता, मी बाहेर गेलेली नाही, त्यामुळे मी ते पाहिलं नाही. पण, भाजपमध्ये एक शिस्त असते, प्रत्येक कार्यकर्ता ती शिस्त पाळतो. त्यामुळे, कुणी नाराज असेल असं मला वाटत नाही. शिंदेंच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे असतील का, या प्रश्नावर पंकजा यांनी हसत हसत उत्तर दिले. मला माहिती नाही, प्रत्येक वेळेस पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा होते. त्यामुळे, यावेळीही वरिष्ठ नेतेच यासंदर्भातील निर्णय घेतील. माझी कुठलीही अपेक्षा नाही, वरिष्ठ जे ठरवतील ते मी करायला तयार आहे, असे पंकजा यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
शिवसेनेच्या १४ आमदारांबाबत शिंदे काय म्हणाले
शिंदेंनी काही वेळापूर्वीच्या पत्रकार परिषदेत आपली ताकद किती याची आकडेवारी सांगितली, तेव्हा त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. 'आणखी किती येतील माहित नाही...' याचा अर्थ आता राजकीय लोक काढू लागले आहेत. शिंदेंचे हे वाक्य ठाकरेंसोबत राहिलेल्या १४ आमदारांबाबतचे आहे. यात आदित्य ठाकरे देखील आहेत. केसरकरांनी देखील काल आमचा व्हीप डावलला तर अपात्रतेची कारवाई करायची की नाही याचा निर्णय शिंदे घेतली असा इशारा दिला आहे. यामुळे शिंदे गटासोबत आता शिवसेनेच्या उर्वरित १४ आमदारांची फरफट होते की काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.