'शिवसेना डबल गेम खेळतेय!'...तर राज्यसभा सदस्यत्व सोेडेन - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 08:16 PM2018-03-14T20:16:42+5:302018-03-14T20:16:42+5:30
राज्यसभा सदस्य सोडण्याची तयारी दर्शवत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या लढ्यात उडी घेतली आहे
मुंबई : कोकण रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी राज्यसभा सदस्य सोडण्याची तयारी दर्शवत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या लढ्यात उडी घेतली आहे. नाणार प्रकल्पाविरोधात बुधवारी आझाद मैदानात एकवटलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह याठिकाणी आलेल्या राणेंनी शिवसेनेचा समाचार घेत अनेक गौप्यस्फोट केले.
राणे म्हणाले की, माझ्या पक्षाचे काय करायचे? ते येत्या ८ ते १० दिवसांत भूमिका जाहीर करेल. मात्र नाणार प्रकल्प रद्द करूनच दाखवणार. त्यासाठी सरकारने दिलेल्या राज्यसभा सदस्य पदावर पाणी सोडावे लागले तरी चालेल. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना डबलगेम खेळत आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रकल्पाला विरोध दाखवत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे मंत्री प्रकल्पाला परवानग्या देत आहेत. त्यामुळे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री माझे ऐकतात की शिवसेनेचे, हे कळेलच अशा शब्दांत राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिले.
दरम्यान, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या नेतृत्त्वाखाली हजारोंच्या संख्येने कोकणवासीय बुधवारी आझाद मैदानात एकवटले होते. संघटनेचे शिष्टमंडळ नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. ‘स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध आहे, हे प्रथमच निदर्शनास येत आहे’; अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी प्रथमच दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वालम म्हणाले की, आत्तापर्यंत मुख्यमंत्री प्रकल्पाला विरोध दिसला, तरच प्रकल्प लादणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र आज प्रथमच त्यांनी विरोध दिसल्याची कबुली दिली. शिवाय या विरोधाचा उल्लेख करून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्याचे तोंडी आश्वासन दिले.
या आश्वासनानंतरही नाखुश असलेल्या शिष्टमंडळाने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. मात्र त्यानंतर नारायण राणे यांनी पुन्हा शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. शिवाय एका महिन्यात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासित केले. तसेच फोनवरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत उपोषणाचा निर्णय मागे घेतल्याचे वालम यांनी सांगितले.