Join us

Shivsena: महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावा आणि निवडून येऊन दाखवा; आदित्य ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 1:15 PM

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.

मुंबई - माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टिका करताना सुरुवातीपासूनच गद्दार हा शब्द वापरला आहे. गद्दार, विश्वासघातकी आणि पाठित खंजीर खुपसला असे म्हणत आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर जबरी टिका करत आहेत. आदित्य ठाकरेंचा हा पवित्रा विधिमंडळाच्या अधिवेशन काळातही कायम आहे. आदित्य यांन पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधत विश्वासघातकी असे म्हणत हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार असल्याचं म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पलटवार केला आहे. माजी नगरसेवक शितल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. त्यावेळी, आदित्य ठाकरे यांनी हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे. हे गद्दारांचं सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू. आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभे आहोत. हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यावर, आता शितल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

आदित्यजी, गेल्या अनेक दिवसांपासून पाठित खंजीर खुपसणं, गद्दारी, विश्वासघात हे शब्द आम्ही आपल्या तोंडून ऐकत आहोत. खरं तर या विषयावरबोलायचं नव्हत, बोलणारही नव्हतो. पण, आज आपण बोलायला भाग पाडत आहात. या शब्दांची व्याख्या आपण समजून घेतली तर बरं होईल. आज आपण आमदार झालात, त्यावेळी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून मतं मागितली. त्यामुळे, आपल्या आमदार होण्यामागे कुठेतरी भाजपचीही मतं आहेत, हे विसरु नये. 

आपण महाविकास आघाडी स्थापन करुन सत्तेत आला. त्यामुळे, कोणी विश्वासघात केला असेल तर तो आपण केलाय. कोणी मतदारांच्या पाठित खंजीर खुपसला असेल तर तो आपण खुपसलाय. जर कोणी गद्दारी केली असेल तर ती माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आपण केलीय, असे म्हणत शितल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केला आहे. 

तुम्हीच राजीनामा द्या

बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आम्ही रामराज्य आणायचा प्रयत्न करत आहोत. जर राजीनामा कुणाला द्यायचा असेल तर तो आपण द्यावा, आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून आपण निवडून यावं, मग समजेल खरं हिंदुत्त्व काय असतं. त्यामुळे आम्हाला शिकवू नये, हिंदुत्त्व काय असतं, अशा शब्दात शितल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.  

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेमुंबईमहाविकास आघाडी