Join us

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचं वादग्रस्त विधान; देशभरात वादंग, शिवसेनेनेही फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 2:59 PM

या प्रकरणात विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुंबई – काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या Sunrise Over Ayodhya या पुस्तकामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्ववादी संघटनांची तुलना थेट दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरमसोबत केली आहे. बुधवारी खुर्शीद यांचे हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर २४ तासांच्या आत दिल्लीच्या पोलीस ठाण्यात पुस्तकाविरोधात गुन्हा नोंद झाला. या पुस्तकाच्या वादावरुन शिवसेनेनेही सलमान खुर्शीद यांना फटकारलं आहे.

सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्व काय आहे ते समजून घ्यावं. हिंदुत्ववादी संघटनांची कामं काय आहेत ज्याची तुलना थेट ISIS ची करावी लागली. ISISI ची तुलना करावी हे निंदनीय आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी जगभरात कुठेही बॉम्बस्फोट घडवले नाहीत. त्यामुळे खुर्शीद यांनी जी मुक्ताफळं उधळली आहेत. त्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.

या प्रकरणात विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न सलमान खुर्शीद यांनी केला आहे. त्याचसोबत भाजपाने या पुस्तकावरुन सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ही भूमिका केवळ सलमान खुर्शीद यांचीच नव्हे तर काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. देशात बहुसंख्याक असलेल्या समाजाच्या भावना दुखावण्यासाठीच हे विधान केलं असावं हे यातून स्पष्ट होते. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरुनच हे वारंवार केले जाते असा आरोप भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे.

जर काँग्रेस हिंदुंचा सन्मान करतं तर त्यांनी पुढे येऊन या प्रकरणावर बाळगलेलं मौन सोडावं. जर तुम्ही हे केले नाही तर यापुढे संशय राहणार नाही की काँग्रेसची विचारधारा ही हिंदुद्वेष्टी आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत गल्लोगल्ली फिरून हे बोलण्याची हिंमत ठेवता का? हिंदु धर्म आणि हिंदुत्वाचा अर्थ ISIS आणि बोको हरमची विचारधारा आहे असंही भाजपाने विचारलं आहे.

सलमान खुर्शीद यांनी पुस्तकात काय म्हटलंय?

या वादग्रस्त पुस्कात सलमान खुर्शीद म्हणतात की, हिंदुत्व सनातन, साधू-संत आणि प्राचीन हिंदू धर्म बाजूला ठेवत आहे, जे प्रत्येक प्रकारे ISIS आणि बोको हराम सारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखं आहे. हिंदुत्वाचं राजकारण करणारे चुकीचे लोक आहे आणि ISIS ही वाईट आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :सलमान खुर्शिदकाँग्रेसशिवसेना