Join us

विधानसभा अध्यक्षपद एका वर्षात राजीनामा देण्यासाठी नव्हतं; शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 8:41 AM

saamana Editorial: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य

काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद पाच वर्षांसाठी दिलं होतं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. (Saamana Editorial on Congress State President Selection) 

शिवसेनेनं काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या नव्या निवडीसाठी नाना पटोले यांचं अभिनंदन तर केलंच पण विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. "काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल", असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरातांचं कौतुकसामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला आहे. "बाळासाहेब थोरात जाऊन पटोले येत आहेत एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाह. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची अवस्था अशी झाली होती की, राज्यात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हते. अशावेळी बाळासाहेब थोरातांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले व अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले. आज काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात सत्तेतील महत्वाचा भागीदार आहे व पक्षाला संजीवनी मिळाली आहे. संकटकाळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची धुरा सांभाळली. नागपुरात विधानसभेचे दोन आमदार निवडणून आले. सोनिया, प्रियांका किंवा राहुल गांधींची एखादी सभा झाली असती तर नागपुरात दोनाचे चार झाले असते", असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. 

विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेनं एक मंत्रीपद सोडलं होतं "विधानसभा अध्यक्षपद महाआघाडी सरकारच्या वाटाघाटीत काँग्रेसकडे गेले खरे, पण त्या बदल्यात शिवसेनेने आपल्या कोट्यातील एक जादा मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. आता शरद पवारांचे म्हणणे पडले की, विधानसभा अध्यक्षपदाचे काय करावे? यावर तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. एक मात्र नक्की पवारांच्या भूमिकेत दम आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते कसेही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. म्हणजे पवारांच्या मनात नेमके काय विचार घोळत आहेत ते पाहावे लागेल", असंही 'सामना'मध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :नाना पटोलेशिवसेनाकाँग्रेस