वर्ल्ड कप फायनलआधी राजकीय 'सामना'; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:22 PM2023-11-19T12:22:05+5:302023-11-19T12:23:11+5:30

एकीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याला सुरुवात होण्यास काही मिनिटांचाच अवधी शिल्लक असताना दुसरीकडे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत.

shivsena Sanjay Raut allegation against BJP before ind vs aus World Cup final match | वर्ल्ड कप फायनलआधी राजकीय 'सामना'; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती आरोप

वर्ल्ड कप फायनलआधी राजकीय 'सामना'; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती आरोप

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याकडे सर्वच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दमदार कामगिरी करत कागांरुंना पराभवाची चव चाखायला लावण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतापासूनच स्टेडियमवर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या क्रिकेट सामन्यावरून आता राजकीय कलगीतुराही रंगू लागला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वर्ल्ड कप फायनलवरून भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

"या देशात आता प्रत्येक गोष्टीचा राजकीय इव्हेंट केला जात आहे. जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचं सरकार आलंय तेव्हापासून एखाद्याचा मृत्यू झाला तरी त्याचा राजकीय इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्रिकेट सामना असला तरी त्याचा राजकीय इव्हेंट होतोय. आता भारतीय संघ फायनल जिंकला की मोदींमुळेच हा सामना जिंकला, अमित शहाच विकेटच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करत होते, असा प्रचार भाजपकडून सुरू होईल. काल-परवापर्यंत हा खेळ होता, पण आता त्याचा राजकीय इव्हेंट करून टाकला आहे," असा घणाघात संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतून केला.

खेळाचं राजकारण होत असल्याचा आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, "पूर्वी मुंबई हे शहर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जात होते. अशा प्रकारच्या खेळाचे इव्हेंट मुंबई, दिल्ली किंवा पश्चिम बंगालमधील ईडन गार्डन मैदानावर होत असत. मात्र आता मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबादमध्ये हलवण्यात आलं आहे. कारण त्यांना क्रिकेटचंही राजकारण करायचं आहे," असा आरोपही राऊत यांनी केला.

ममता बॅनर्जींनी साधला होता निशाणा

भाजपकडून खेळात राजकारण आणलं जात असल्याचं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नुकतंच भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. "आता सर्व काही भगवं होत आहे. आम्हाला आपल्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे. मला विश्वास आहे की ते वर्ल्ड कप जिंकतील. पण जेव्हा भारतीय संघातील खेळाडू सराव करतात तेव्हा त्यांचा पेहरावही आता भगवा करण्यात आला आहे. पूर्वी ते निळ्या रंगाचे कपडे घालायचे. आता मेट्रो स्टेशनलाही भगवा रंग दिला जात आहे," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.
 

Web Title: shivsena Sanjay Raut allegation against BJP before ind vs aus World Cup final match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.