Join us  

फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:43 AM

शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि राज्यातील आरक्षण प्रश्नावरून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर शिवसेनेतील दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या काही शिवसैनिकांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. "राज्यात नेमकं काय सुरू आहे, हे गृहमंत्र्यांना माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांना कोंडून ठेवून दुसरंच कोणी गृहमंत्रालय चालवत आहे का?" असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

शिवसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, "रस्त्यावर झालेल्या संघर्षानंतर शिवसैनिकांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करणे, ही गृहमंत्रालयाची विकृती आहे. गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला नाही तर काय करायचे आहे ते आम्ही बघू. जे गद्दार आणि राजकीयदृष्ट्या भ्रष्ट आहेत त्यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर रोखण्याचा नक्कीच प्रयत्न झाला. अशा शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून तुम्ही तुमची विकृती दाखवली. हीच विकृती महाराष्ट्राला बदनाम करत आहे. मात्र तुम्ही आमच्यावर असे कितीही खोटे गुन्हे दाखल करा, तरीही न्यायालयात आणि रस्त्यावर आमचा संघर्ष सुरूच राहील," असा इशारा राऊत यांनी सरकारला दिला आहे.

"राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणावरून वातावरण तापलं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना-गृहमंत्र्यांना पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चिंता आहे. आपलं राज्य सोडून ते प्रचारासाठी बाहेर जात आहेत," असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला आहे.

राहुल गांधींकडून मोदींचा 'पनौती' म्हणून उल्लेख, राऊत काय म्हणाले?

विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काल राजस्थान येथे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. राहुल गांधी यांनी भाषणात विविध मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पनौती...पनौती असा उल्लेख होऊ लागला. हाच धागा पकडत राहुल गांधी यांनी वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवावरून मोदींना लक्ष्य केलं. 'आपले खेळाडू वर्ल्ड कप फायनल जिंकले असते, पण तिकडे पनौती पोहोचल्याने आपण सामना हरलो,' असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल यांच्या या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सोशल मीडियावर याबाबतचा ट्रेंड सुरू आहे. मात्र आम्ही नेहमीच पंतप्रधानपदाचा सन्मान करतो. तुम्ही व्यक्तीवर टीका करू शकता, पण पंतप्रधान, राष्ट्रपती या पदाबद्दल बोलताना काळजी घ्यायला हवी. मात्र राहुल गांधींनीही लोकांची भावना व्यक्त केली आहे. त्यांची भाषण करण्याची एक शैली आहे, इतकंच मी म्हणेल," अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीसभाजपामराठा आरक्षण