मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याचं समोर आले आहे. सकाळपासून सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर उदय सामंत सूरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. ANI या वृत्त संस्थेने याबाबत ट्विट केले आहे. एकीकडे शिंदेगटातील आमदारांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे संजय राऊत बंडखोर आमदारांबद्दल विधान करुन त्यांचावर घणाघाती टीका करत आहेत.
मंत्री उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत, ज्यांनी शिंदेगटात प्रवेश केला आहे. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेत विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. एकीकडे आमदारांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे संजय राऊत फायरी स्पीच देत बंडखोरांवर जहाल टिका करत आहेत.
संजय राऊत यांच्याबद्दल प्रत्यक्षपणे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, दिपक केसरकर, अब्दुल सत्तार यांनी थेट नाव घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिलं. तरीही, संजय राऊत बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका करत आहेत. त्यावरुन, भाजप नेते आणि गुवाहटीतील हॉटेलमध्ये असलेले मोहित कंबोज यांनी ट्विट करुन संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत तोंड उघडताच शिवसेनेचा एक आमदार कमी होतो, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.
आम्ही कोणाचे गुलाम नाही, आम्हालाही स्वाभिमान - सत्तार
संजय राऊत म्हणतात, अब्दुल सत्तारांना कशाचं आलंय हिंदुत्त्व. मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. हिंदुत्त्वाचा भगवा हाती घेतला. पण, ते बोलतायंत टिव्हीवर, आम्ही काही कोणाचे गुलाम नाही, आम्ही कोणाचे नोकर नाहीत, आम्हालाही स्वाभिमान आहे, अशा शब्दात बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर टिका केली. मी 42 वर्षांचा राजकारणी आहे. मात्र, ज्या पद्धतीने ते आम्हाला बोलतात, ती पद्धत योग्य नाही. आम्हालाही स्वाभीमान आहे. 50 आमदार जे इथे बसलेत ते भावना बोलतात तेव्हा शरीराला, मनाला वेदना होतात, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. ग्रामपंचायत सदस्यांनासुद्धा एकत्र बांधण्यासाठी प्रयत्न केले जातात. आम्ही तर आमदार आहोत, मी राज्यमंत्री आहे. पण, आमच्याबद्दल हे बोलणं बरोबर वाटत नाही, असे सत्तार यांनी म्हटलं. तसेच, राज्यात नवीन सरकार येणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.