Shivsena: संजय राऊत म्हणाले, बाहेर पडण्यास तयार; आता राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 05:01 PM2022-06-23T17:01:41+5:302022-06-23T17:06:51+5:30
मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती
मुंबई - शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष नाराज झाल्याची चर्चा होत असतानाच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून कसे पलायन केले याचा घटनाक्रम सांगितला. तसेच, भाजपकडून शिवसेनेविरोधात कटकारस्थान आखले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी पलायन केलेल्या आमदारांनी इथे येऊन भेटावं, बोलावं, त्यांच्या मागणीची नक्कीच विचार केला जाईल. आता, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीसंदर्भात भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 23, 2022
महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल, असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही महाविकास आघाडी सरकार गरज पडल्यास बहुमत सिद्ध करेल असे म्हटले. तसेच, संजय राऊत आणि इतर नेत्यांशी माझी चर्चा झाली. त्यांनी त्यांची बाजू मांडताना, त्या आमदारांना इथे येऊ तरी द्या, असे म्हटल्याचे खर्गे यांनी सांगितले.
काय म्हणाले संजय राऊत
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्य़ास तयार आहे. परंतू आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असेही राऊत म्हणाले.