मुंबई - शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष नाराज झाल्याची चर्चा होत असतानाच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून कसे पलायन केले याचा घटनाक्रम सांगितला. तसेच, भाजपकडून शिवसेनेविरोधात कटकारस्थान आखले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी पलायन केलेल्या आमदारांनी इथे येऊन भेटावं, बोलावं, त्यांच्या मागणीची नक्कीच विचार केला जाईल. आता, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीसंदर्भात भाष्य केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्य़ास तयार आहे. परंतू आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असेही राऊत म्हणाले.