Sanjay Raut: 'ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहास पुसतात', पंडित नेहरुंचा फोटो वगळल्यानं संजय राऊत भडकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 09:06 AM2021-09-05T09:06:53+5:302021-09-05T09:07:35+5:30

Sanjay Raut: 'राहुल गांधी, प्रियांका, सोनियांशी मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का?'

Shivsena Sanjay Raut Slam Modi GOVT BJP Over Indian Council of Historical Research remove photo of pandit javaharlal nehru | Sanjay Raut: 'ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहास पुसतात', पंडित नेहरुंचा फोटो वगळल्यानं संजय राऊत भडकले!

Sanjay Raut: 'ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहास पुसतात', पंडित नेहरुंचा फोटो वगळल्यानं संजय राऊत भडकले!

Next

Sanjay Raut: भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या 'इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च' (ICHR) या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा फोटो वगळल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी, प्रियांका, सोनियांशी मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का? नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेहरुंचे स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही", अशा शब्दांत संजय राऊत यांनी 'रोखठोक'मधून सरकारवर निशाणा साधला आहे. 

देशांच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलला जात आहे काय? यावर आता राजकीय वादळ उठले आहे. ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यात धन्यता मानतात, ही जगभराची रीत आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

नेमकं काय म्हणाले राऊत?
इतिहासावर संशोधनावर काम करणाऱ्या 'इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च' या संस्थेनं 'आजादी का अमृत महोत्सव'च्या पोस्टरवर पंडित नेहरुंचं चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्र ठळकपणे आहेत. पण पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. नेहरु , आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरुंना खासकरुन वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवले, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

इतिहास म्हणजे काय?
स्वातंत्र्य लढा हा आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे मनुष्याच्या प्रगतीची व दोषांची नोंद असते. इतिहास म्हणजे त्या त्या कालखंडातील त्या त्या लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विचारांचे, आशा- आकांक्षांचे, घडामोडींचे आणि स्थितीचे प्रतिबिंब असते. त्या घटनांचे, घडामोडींचे, विचारप्रवाहांचे ते एक प्रकारचे विवेचन असते. थोडक्यात, इतिहास हे मानवी समाजाचे एक अखंड, अभंग आणि अविभाज्य छायाचित्रच असते. त्या छायाचित्रांतून पंडित नेहरूंना वगळून कोणाला काय साध्य करायचे आहे?

Web Title: Shivsena Sanjay Raut Slam Modi GOVT BJP Over Indian Council of Historical Research remove photo of pandit javaharlal nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.