मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) विरुद्ध भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) असा वाद रंगला आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात आरोपांची मालिका सुरू केली आहे. सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जनतेकडून कोट्यवधी जमा केले आणि हे पैसे स्वत:साठी वापरले असा गंभीर आरोप करत राऊतांनी राज्यपाल कार्यालयाकडून आलेले पत्र दाखवलं. त्यानंतर किरीट सोमय्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
"किरीट सोमय्या मुलासह फरार, हे दोन ठग कोठे आहेत?; मेहुल चोकसीप्रमाणे पळून तर गेले नाहीत?" असं म्हणत निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत. न्याययंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ना?" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी काय आरोप केले?
किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचे काय झाले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली. त्या निधीचे काय झाले, याचं उत्तर लोकांना मिळायला हवे. सध्या भाजपचे कार्यालय झालेल्या राजभवनाने आपल्याला सोमय्यांकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचे म्हटले आहे. त्याची कागदपत्रे माझ्याजवळ आहेत. या विक्रांत फाईल्स काश्मीर फाईल्सपेक्षा गंभीर आहेत, असे राऊत म्हणाले. तसेच, सोमय्यांनी 58 कोटी रुपये लाटल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
केवळ 35 मिनिटे निधी गोळा केला - सोमय्या
आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटेच निधी गोळा केल्याचे स्पष्टीकरण सोमय्यांनी दिले आहे. विक्रांतसाठी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता. 35 मिनिटे मी निधी गोळा केला, जेमतेम 10 लोकांनी डब्यात पैसे टाकले. अवघ्या 35 मिनिटांत इतका निधी कसा काय गोळा होऊ शकतो. काँग्रेसनंदेखील भीक मांगो आंदोलन केलं होतं. त्यातून त्यांनी किती पैसे गोळा केले, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.