लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड थंड करण्यासाठी व सरकार वाचविण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हा, अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र, शिंदे यांनी ती धुडकावून लावल्याचे समजते. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी म्हटले होते.
शिंदे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडा अन् भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी अट ठेवली. आता सरकार टिकविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी शिवसेनेने दर्शविल्याचे सांगण्यात येते. एका नेत्याने शिंदे यांच्याशी चर्चा करून ही ऑफर दिली. मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्तेत कायम राहून मुख्यमंत्रीपद घेण्यात आपल्याला कुठलाही रस नसल्याचे सांगत शिंदे यांनी ती फेटाळली असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे देण्याचे ठरलेले होते. मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावे, हा त्यांचा प्रश्न आहे असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.