भाजपाचा नारा बेटी बचाव नव्हे, तर बेटी भगाव; शिवसेनेची राम कदमांवर खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:44 PM2018-09-05T13:44:39+5:302018-09-05T13:45:03+5:30
मुलींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या राम कदमांवर टीकेची झोड
मुंबई: लग्नासाठी मुली पळवून आणू, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मित्रपत्र शिवसेनेनंदेखील राम कदमांवर निशाणा साधला. भाजपाचा नारा बेटी बचाव आहे की बेटी भगाव, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे आमदार मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असतील, तर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचं काय, असादेखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एखाद्या मुलाला आणि त्याच्या आई-वडिलांना मुलगी पसंत असेल, मात्र त्या मुलीचा नकार असेल, तर त्या मुलीला पळवून आणेन, असं वादग्रस्त विधान राम कदम यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून सडकून टीका होत आहे. विरोधकांसह सर्वसामान्यांदेखील राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेनंदेखील राम कदम यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. भाजपाचा नारा बेटी बचाव आहे की बेटी भगाव असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे !
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 4, 2018
कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित? pic.twitter.com/Z5JAx5ewrN
काय म्हणाले होते राम कदम?
भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.