'मुख्यमंत्री नाणारवासीयांच्या बाजूने की दलालांच्या?'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 09:26 PM2018-04-23T21:26:00+5:302018-04-23T21:26:00+5:30

शिवसेना नेते अनिल परब यांचा सवाल

shivsena slams cm devendra fadnavis over nanar oil refinery project | 'मुख्यमंत्री नाणारवासीयांच्या बाजूने की दलालांच्या?'

'मुख्यमंत्री नाणारवासीयांच्या बाजूने की दलालांच्या?'

Next

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाणारवासीयांच्या बाजूने उभे राहणार की दलालांच्या मागे उभे राहणार, असा सवाल विधान परिषदेतील शिवसेनेचे गट नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाणार रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार टीका केली. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे, आता  प्रकल्प ज्यांना करायचा आहे त्यांनी तो करून दाखवावा, असे थेट आव्हान त्यांनी भाजपाला दिले. शिवसेनेचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात निर्णय घेऊन दाखवावा, असेही ते म्हणाले.
 
नाणार प्रकल्पाची अधिसूचना काढण्याचा अधिकार जर मंत्र्यांना आहे, तर ती अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारही मंत्र्यांना आहे. हाय पॉवर कमिटीला अधिकार आहे आणि मंत्र्यांना अधिकार नाही, असे कुठल्याही कायद्यात नसल्याचं अ‍ॅड. परब यांनी सांगितले. शाह आणि मोदी कोकणवासी कधी झाले, कोकणात शेती कधीपासून करू लागले असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. नाणारमध्ये प्रकल्प होणार म्हणून जमिनी घेणारे हे सर्व शेतकरी नसून जमिनीचे दलाल असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नाणार रिफाईनरी निर्देशित औद्योगिक क्षेत्रात जमीन विकत घेणाऱ्या काही ‘गरीब शेतकऱ्यांची’ यादीच त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सादर केली. यात गुजरातमधील अनेक उद्योगपती व धनाढ्य व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या यादीतील अनेक नावे भाजपाच्या मोठ्या नेत्यांशी संबंधित आहेत. अशाच प्रकारे शिवसेनेकडे डीएमआईसी आणि समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी असून त्यातदेखील कोकणात जमिनी घेणारे हेच ‘गरीब’ आणि बहुतांश गुजरातमधील ‘शेतकरी’ असल्याचा आरोपही अ‍ॅड. परब यांनी पत्रकार परिषदेत केला.
 

Web Title: shivsena slams cm devendra fadnavis over nanar oil refinery project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.