Join us  

Shivsena: ठरलं! शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 4:18 PM

अयोध्येत काही बॅनर झळकले असून या बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार असतानाच आता शिवसेनेकडून ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ असे बॅनर अयोध्येत फडकविण्यात आले आहेत. यानिमित्ताने शिवसेना-मनसेमधील वाद हा थेट अयोध्येत पोहोचला आहे. या बॅनरसंदर्भात बोलताना ते कुणी लावले याची कल्पना नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीखही त्यांनी जाहीर केली. 

अयोध्येत काही बॅनर झळकले असून या बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. दोन पक्षांमध्ये हिंदुत्वावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज यांची हिंदुत्वाची भूमिका नकली असल्याचे शिवसेनेने या बॅनरमधून सूचित केले. यासंदर्भात संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.  ''असली नकली काय आहे, ते पोस्टर कुणी लावले हे मला माहिती नाही. मात्र, अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरू झालीय, एवढच मला माहिती आहे. प्रभू श्रीराम एका धर्माचे नसून ते सगळ्यांचेच भगवान आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळेच जातात. मात्र, कोणी नकली भावनेतून जात आहे, राजकीय हेतुने जात आहे किंवा कुणाला कमीपणा दाखविण्यासाठी जात असेल तर विरोध होईलच, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे तिथं गेले होते. आता, आदित्य ठाकरे 10 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. आदित्य यांच्यासोबत शिवसैनिक, युवासैनिक आणि शिवसेनेशी जोडलेले सर्वच लोकं अयोध्येत जमा होतील, असेही संजय राऊत यांनी सांगितलं. 

राज यांना अयोध्येत येण्यापासून रोखणार

राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्यावरुन वाद रंगल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या समर्थकांनी आता राज यांच्याविरोधात अयोध्येत बॅनर युद्ध छेडले आहे. खा. सिंह यांनी 5 जूनला ‘चलो अयोध्या’ अशी हाक दिली आहे. त्यादिवशी राज यांना अयोध्येत येण्यापासून रोखले जाईल, असेही त्यांनी बजावले आहे. राज हे उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागत नाहीत, तोवर योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये. ठाकरे कुटुंबाचा राम मंदिर आंदोलनाशी काडीचाही संबंध नव्हता. रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचेच योगदान आंदोलनात होते, असे ब्रिजभूषण सिंह यांनी समाजमाध्यमात म्हटले आहे. यावर बोलण्यास संजय राऊत यांनी नकार दिला.  

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतमनसेराज ठाकरेआदित्य ठाकरे