Mumbai BMC demolished Uddhav Thackeray Office: मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या ठाकरे गटाच्या वतीने थाटण्यात आलेल्या कार्यालयावर हातोडा पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीपासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या या कार्यालयावर महानगरपालिकेने हातोडा चालवला. ठाकरे गटाच्या वतीने उभारले गेलेले ऑटो चालक वेलफेअर असोशिएशनचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दिली.
"हे कार्यालय जवळपास ४० ते ५० वर्षे जुनं आहे. एकीकडे बऱ्याच झोपड्या या अधिकृत केल्या जात आहेत. वांद्र पश्चिम मधील अनेक झोपड्या तशा आहेत, पण त्यांना हात लावण्याची सरकारमध्ये हिंमत नाही. भाजपाचे एक कार्यालयही आहे. तेदेखील अनधिकृत आहे आणि ते काही दिवसच जुने आहे. त्यामुळे ते देखील तोडण्याची तयारी दाखवली पाहिजे. इतक्या नीच पद्धतीने केली जाणारी कारवाई पाहता, आपण महाराष्ट्राला कुठल्या थराला घेऊन चाललो आहोत हेच कळत नाही. हे वैर सुरू असून हे सरकार क्रूरपणे काम करत आहे. जनसेवेची ही केंद्र आहेत. ती का तोडली जात आहेत? भाजपाचे सुरूवातीला मुंबईत एकही कार्यालय नव्हते पण मग आता त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले इथपासून सर्व सुरूवात होईल," अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांच्यावर आरोप केला.
"ज्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली ते कार्यालय ४० पोलिस ठाण्याच्या समोर आहे. जर ते कार्यालय अनधिकृत आहे असे पालिकेचे मत होते तर तशी नोटीस का देण्यात आली नाही? थेट तोडकामाची कारवाई करणे कितपत योग्य आहे?" असा सवालही आमदार सावंत यांनी केला.