Join us

आम्ही 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतं मागितली तर चालेल?; ठाकरेंचा निवडणूक आयोगाला खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 3:28 PM

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मात्र जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवण्यात यश आलं आहे. भाजपचा हा विजय लोकसभेसाठी इंडिया या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक तयारी करणाऱ्या देशभरातील विरोधी पक्षांसाठी धक्का मानला जात आहे. या निवडणूक निकालाचे देशभरात पडसाद उमटत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या निकालावर भाष्य केलं आहे. शिवालय या पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत विजय मिळवलेल्या भाजपचं अभिनंदन करताना निवडणूक आयोगावर मात्र जोरदार हल्लाबोल केला आहे.

"विधानसभा निवडणुकीत जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन मी केलं आहे. मात्र निवडणुकीत देवाच्या आणि धर्माच्या नावाने मतं मागणं हा गुन्हा आहे का? असा प्रश्न विचारत मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. उदाहरणासह मी त्यात विविध गोष्टी नमूद केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग बलीच्या नावाने मते मागितली. आता मध्य प्रदेशच्या निवडणुकीत अमित शहा यांनी मतदारांना विजयी झाल्यास रामलल्लाच्या दर्शनाला घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं, याचाही उल्लेख मी पत्रात केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात निवडणूक काळात हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याने निवडणूक आयोगाने त्यांना ६ वर्ष निवडणूक लढवण्यास बंद घातली होती. एवढंच काय पण त्यांचा मतदानाचा अधिकारही हिरावून घेतला होता. मग आता जे सुरूय त्याचं काय?  या पत्राला निवडणूक आयोगाकडून अद्याप उत्तर देण्यात आलेलं नाही. याचा अर्थ निवडणुकीत देवाचे आणि धर्माचे नाव वापरण्यास तुमची हरकत नाही, असा अर्थ आम्ही घेऊ आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया अशा आमच्या देवांची नावे घेऊ," असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका

राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले की, "सरकार आपल्या दारी या नावाखाली जो बोगसपणा सुरू होता, तो आता बंद पडला आहे. कारण लोक त्याकडे बघतही नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मी शेतकऱ्यांचं २ लाख रुपयांपर्यंतचं पीककर्ज माफ केलं होतं. करोना काळात शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारली होती. सरकारने आता भुलभुलैय्या न करता तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी आमची मागणी आहे."

दरम्यान, "जिथंजिथं शेतकरी संकटात आहे, तिथं शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा," असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेभारतीय निवडणूक आयोगशेतकरी