मुंबई : मान्सून मुंबईत लवकरच दाखल होणार असल्याने त्यापूर्वीच्या कामांची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. मात्र याबाबतची माहिती महापौरांऐवजी या वर्षी मुख्यमंत्र्यांनी दिली. महापालिकेच्या कामकाजात भाजपा सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेच्या गोटात यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच वर्मावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेचे सत्ता केंद्र मंत्रालयात निर्माण होत असल्याचा टोला स्थायी समितीच्या बैठकीत लगावला. यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली.मुंबईच्या विकास आराखड्याची माहिती मंत्रालयातून थेट जाहीर करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात अशा अनेक मोठ्या प्रकल्पांची घोषणा मंत्रालयातूनच होत असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. ‘मिशन १००’ थोडक्यात हुकल्यामुळे मुंबई महापालिकेत आपला महापौर बसविण्याचे भाजपाचे स्वप्न भंगले. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपाची उरलीसुरली आशाही संपली. त्यामुळे भाजपा सरकारने आता मंत्रालयातूनच महापालिकेतील सूत्र हलविण्यास सुरुवात केली आहे.मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळापूर्व कामांची माहिती व महापालिकेने केलेल्या तयारीची माहिती दिली. दरवर्षी ही माहिती महापौर व पालिका आयुक्त जाहीर करीत असतात. यावर राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. पालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास विभाग असून त्यांना मुंबईची काळजी असल्याने त्यांनी ही माहिती दिली. महापौरांना कोणी रोखले, असा खोचक सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. यामुळे शिवसेना आणि भाजपात चांगलीच जुंपली.
‘शिलेदार घायाळ’, भाजपा सरकारच्या हस्तक्षेपाने शिवसेना अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 2:23 AM