Join us

Shivsena: "आम्ही गुलाम नाही, कोणाचे नोकर नाहीत", अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 2:37 PM

शिवसेनेतील बंडखोर शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे

मुंबई - राज्याच्या राजकारणातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटून वेगळा झाल्याने राजकीय उलथापालथ झाली आहे. शिंदे गटासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं असून आता, हा वाद न्यायालयात गेला. शिवसेना नेते संजय राऊत अतिशय आक्रमक पद्धतीने विधान करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे, आता बंडखोर आमदारांकडूनही पलटवार करण्यात येत आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राऊत यांच्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. 

शिवसेनेतील बंडखोर शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे. शिंदे गटाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यात, त्यांनी नावाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. त्यानंतरही, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टिका केली आहे. तर, अब्दुल सत्तार यांना कसलं आलंय हिंदुत्त्व असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता, सत्तार यांनी राऊतांना, आम्ही कोणाचे गुलाम नाहीत, असे म्हणत पलटवार केला. 

संजय राऊत म्हणतात, अब्दुल सत्तारांना कशाचं आलंय हिंदुत्त्व. मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. हिंदुत्त्वाचा भगवा हाती घेतला. पण, ते बोलतायंत टिव्हीवर, आम्ही काही कोणाचे गुलाम नाही, आम्ही कोणाचे नोकर नाहीत, आम्हालाही स्वाभिमान आहे, अशा शब्दात बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर टिका केली. मी 42 वर्षांचा राजकारणी आहे. मात्र, ज्या पद्धतीने ते आम्हाला बोलतात, ती पद्धत योग्य नाही. आम्हालाही स्वाभीमान आहे. 50 आमदार जे इथे बसलेत ते भावना बोलतात तेव्हा शरीराला, मनाला वेदना होतात, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. ग्रामपंचायत सदस्यांनासुद्धा एकत्र बांधण्यासाठी प्रयत्न केले जातात. आम्ही तर आमदार आहोत, मी राज्यमंत्री आहे. पण, आमच्याबद्दल हे बोलणं बरोबर वाटत नाही, असे सत्तार यांनी म्हटलं. तसेच, राज्यात नवीन सरकार येणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले संजय राऊत

शिवसेनेच्या नावाचा वापर करुन त्यांनी मतं मागू नयेत. त्यांनी त्यांच्या बापाचं नाव लावावं, ते स्वत: बाळासाहेबांचे भक्त म्हणतात, पण बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव देण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण, तुम्ही तुमच्या बापाचं नाव द्या, तुमच्या बापाच्या नावानं पक्ष बनवा आणि बापाच्या नावानं मतं मागा. आमच्या पक्षाचा जो बाप आहे, त्याच्या नावाने का मतं मागता. तुम्हाला तर 100 बाप आहेत तिकडं, कोणी दिल्लीत आहे, कोणी नागपुरात आहे, कोणी मुंबईत आहे, असे म्हणत राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टिका केली. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामुंबईएकनाथ शिंदे