Join us

शिवसेना, कुठे नेऊन ठेवलाय भगवा रंग?; धनुष्यबाणाचा 'तो फोटो पाहून नेटकरी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:24 PM

शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि शिवसेना म्हणजे भगवा हे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेची ओळख होती.

मुंबई - शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर शिवसेनेकडून नवीन प्रोफाईल पिक्चर आणि कव्हर पेज ठेवण्यात आले आहे. मात्र, ऐन निवडणुकांच्या काळात शिवसेनेनं बदललेल्या प्रोफाईल पिक्चरमधील धनुष्यबाणाच्या पाठिमागे असणार भगवा रंग गायब झाला आहे. त्याजागी भगव्याऐवजी पांढरा रंग दिसून येत आहे. शिवसेनेकडून बुधवारी हा नवीन प्रोफाईल पिक्चर अपटेड करण्यात आला आहे. त्यावर, अनेक नेटीझन्स आणि शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि शिवसेना म्हणजे भगवा हे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेची ओळख होती. हिंदुत्व आणि भगव्यापुढं काहीही नाही, अशीच जहालमतवादी भूमिका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची राहिली आहे. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नेहमीच हा वारसा जपला आहे. महाराष्ट्रावर आणि दिल्लीवर भगवा फडवकविण्याचं ते नेहमीच आपल्या भाषणात बोलतात. मात्र, शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरील धनुष्यबाणाच्या पोस्टरमध्ये बदल करण्यात आल्याचे दिसून येते आहे. शिवसेनेच्या यापर्वीच्या फेसबुक पेजवरील प्रोफाईलमध्ये काळ्या रंगात धनुष्यबाण दिसत होता. त्यामागे भगवा रंग होता. तर, त्यापूर्वीच्या प्रोफाईल चित्रातही धनुष्यबाणाच्या पाठिमागे भगवा रंग असे. मात्र, बुधवारी नव्याने अपलोड करण्यात आलेल्या फेसबुक प्रोफाईल पिक्चरमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा रंग काळा असून त्यामागील भगवा रंग हटविण्यात आला आहे. त्याऐवजी तिथे पांढरा रंग पावरण्यात आला आहे. या प्रोफाईल पिक्चरवर अनेक नेटीझन्स आणि शिवसैनिकांनी कमेंट करुन भगवा रंग कुठं गेला? असा प्रश्न विचारला आहे. तसेच भगवा रंग गायब झाल्यामुळे अनेकांनी नाराजीही दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेनेतील या बदलाचे नेमके कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपाकडून काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ केलेल्या जाहिरातीमध्ये कमळाचे फुल पाढऱ्या रंगात दशर्विण्यात आले होते. तर, कमळाच्या पाठिमागे भगव्याऐवजी हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर, नेटीझन्सने भाजपाला चांगलेच धारेवर धरले होते.  पण, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी चिन्ह हे काळ्या आणि पांढऱ्या रंगात असते. त्यामुळे असा बदल शिवसेनेनं केल्याचंही काही जाणकारांचं म्हणणं आहे.       

टॅग्स :शिवसेनाफेसबुकभाजपाऑनलाइन