Join us

Shivsena : आगामी निवडणुकांत कुणाला तिकीट मिळणार, आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 10:41 PM

Shivsena : विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यानुसार शिवसेनेत ५० वर्षावरील विद्यमान नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीचं तिकीट न देण्याबाबत माहिती समोर आली आहे.

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकांवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे प्रचारावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. अलीकडेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील सर्व शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदारांची बैठक घेत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. आता, या निवडणुकांसाठी कुणाला तिकीट मिळणार याबाबत युवासेना प्रमुक आदित्य ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं. 

शिवसेनेत(Shivsena) पन्नाशी ओलांडलेल्यांना उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरु आहे. विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यानुसार शिवसेनेत ५० वर्षावरील विद्यमान नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीचं तिकीट न देण्याबाबत माहिती समोर आली आहे. त्यामुळे याआधीही ३ टर्म असो ४ टर्म निवडून आलेला असो तिकीट मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वय ग्राह्य धरुनच तिकीट मिळेल अशी कुजबूज सुरु असल्याचं समोर आली आहे. मात्र, याबाबत आता शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन यासंदर्भात खुलासा केला. त्यानुसार, 'विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं'', असे आदित्य यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  शिवसेनेत जुने आणि नवे शिवसैनिक यांच्यात मध्यंतरीच्या काळात काही वाद समोर आले होते. आदित्य ठाकरेंची युवासेना आणि शिवसेना यांच्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं चित्र समोर आलं. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय असतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेना मुंबई महापालिका निवडणूक लढवणार का हे आगामी काही दिवसांत कळेल. परंतु, तिकीट वाटपासंदर्भात असलेली चर्चा आदित्य यांनी थांबवली आहे. 

सर्वच राजकीय पक्षांमध्ये कुजबूज

गेल्या २ वर्षापासून जगात तसेच राज्यात कोरोनाचं संकट आहे. या कोरोनाच्या संकटात नव्या पिढीने जोमानं रस्त्यावर उतरुन सक्षमपणे परिस्थिती हाताळायला हवी. कोविड काळात वयस्कर नेत्यांना काही निर्बंध पाळावे लागतील. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळायला हवी अशी चर्चा इतर राजकीय पक्षांमध्येही आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनानिवडणूकनगर पालिका