मुंबई : स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेना व भाजपा यापैकी कोणालाच ११४ हा जादुई आकडा गाठता आलेला नाही. उभय पक्षांमध्ये युतीचे गणितही अद्याप जुळलेले नाही. मात्र नवीन महापौर निवडण्यासाठी ९ मार्चपर्यंतचीच मुदत असल्याने नियमानुसार सर्वाधिक नगरसेवकांचे बळ असलेला राजकीय पक्ष महापौरपदावर दावा करणार आहे. त्यामुळे अपक्षांच्या जोरावर आपली ताकद वाढवून शिवसेनेने या पदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.मुंबई महापालिकेत २२७ जागा असल्याने सत्ता स्थापनेसाठी ११४ हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. १९९७पासून एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपा युतीला हा आकडा सहज गाठता येत होता. मात्र युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजपा यांना २०१२च्या तुलनेत अधिक जागा मिळूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. तरी चार अपक्ष नगरसेवकांचे समर्थन मिळवून शिवसेनेने ८८पर्यंत मजल मारली आहे. तर भाजपाकडे अद्याप ८२ संख्याबळ आहे.महापौरपदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ६ मार्च आहे. तोपर्यंत भाजपा आणि शिवसेनेने बहुमत सिद्ध न केल्यास शिवसेनेला महापौरपदावर पहिला दावा सांगता येणार आहे. त्यानंतर या पदासाठी निवडणूक होईल. या स्पर्धेत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस महापौरपदासाठी आपला उमेदवार उतरवणार आहे. त्यामुळे सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेला भाजपावर मात करत स्वबळावर महापौरपद खेचून नेता येणार आहे. (प्रतिनिधी)समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेकडेचवैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष निवडतानाही हीच पद्धत असणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हे पक्ष एकत्र न आल्यास भाजपाच्या तुलनेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेचाच फायदा होणार आहे. एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समाजवादी या पक्षांनी शिवसेना व भाजपा यापैकी कोणालाच समर्थन न देण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. तर मनसेचे अद्याप मौन आहे. >शिवसेना - ८४ अधिक ४ अपक्ष मिळून ८८भाजपा - ८२काँग्रेस - ३१राष्ट्रवादी - ९मनसे - ७समाजवादी - ६एमआयएम - २ अपक्ष - ६ ( ४ जण शिवसेनेत गेले.)
...तर शिवसेना ठरेल महापौरपदाची दावेदार
By admin | Published: February 28, 2017 2:23 AM