फेरीवाल्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 06:16 PM2018-04-03T18:16:54+5:302018-04-03T18:16:54+5:30
शिवसेना ही फेरीवाल्यांच्या मागे खंबीरपणे उभी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे
मनोहर कुंभेजकर
मुंबई - एकीकडे मनसे आणि संजय निरुपम यांच्या फेरीवाल्यांच्या वादा गेले 2 ते 3 महिने ब्रेक लागला असतांना आता मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना आक्रमक होणार आहे. शिवसेना ही फेरीवाल्यांच्या मागे खंबीरपणे उभी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे असा ठोस इशारा शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद(कॅबिनेट दर्जा) व दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिला आहे.
तसेच या फेरीवाल्यांना पर्यायी जागा देऊन मुंबई महानगर पालिकने या अधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करू नये अशी आग्रही मागणी त्यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे त्यांनी केली आहे. मुंबई फेरीवाला सेना (भारतीय कामगार सेना संलग्न) या फेरीवाला संघटनेची जाहिर सभा आमदार प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच गोरेगाव (पूर्व )येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेत आयोजित करण्यात आली होती.या सभेला या संघटनेच्या सदस्यांनी मोठी
गर्दी केली होती.या सभेत प्रामुख्याने रेल्वे परिसराच्या हद्दीतील हटवलेल्या फेरीवाल्यांना पर्यायी जागा आणि अधिकृत फेरीवाल्यांना लायसन्स मिळवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पालिका प्रशासनान फेरीवाल्यांवर कारवाई करत आहे,मात्र यामध्ये बहुसंख्य फेरीवाले हे अधिकृत असून त्यांच्यावरील कारवाईमुळे त्यांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.मुंबई महानगर पालिकेने 2014 मध्ये मुंबईतील 99,435 फेरीवाल्यांच्या सर्व्हे करून या अधिकृत फेरीवाल्यांकडून योग्य ती कागदपत्रे घेतली असून योग्य ते शुल्क आकारून त्यांना पावती दिली जाते.त्यामुळे या सर्व्हे कलेेल्या या अधिकृत फेरीवाल्यांना मुंबई महानगर पालिकेने परवाना देऊन त्यांना जवळच जागा द्यावी.त्यामुळे मुंबईत पिढ्यानपिढ्या आपला व्यवसाय करणाऱ्या या अधिकृत फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही याकडे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जातीने लक्ष द्यावे,अन्यथा फेरीवाल्यांच्या नाय व हक्कांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरले असा ठोस इशारा यावेळी आमदार प्रभू यांनी आपल्या भाषणात दिला.
शिवसेनेने अधिकृत फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उडी घेतली आहे.शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत आगामी निवडणुका या शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.त्यामुळे आगामी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता,मुंबईतील फेरीवाल्यांची सहानभूती आपल्याकडे मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.त्यामुळे आता सेनेच्या विभागवार फेरीवाल्यांच्या संघटना सुरू झाल्या असून आमदार प्रभू यांचे गोरेगावतील फेरीवाल्यांचे विश्वासू सहकारी अशोक देहेरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अधिकृत फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे.
मुंबईतील ज्या फेरीवाल्यांवर अन्याय होत असेल त्यांनी 9820695211 यावर संपर्क साधावा,मी व माझे शिवसैनिक आपल्या मदतीला धाऊन येऊ असे आश्वासन देहरे यांनी दिले.यावेळी सल्लागार राजेश मौर्य यांचे भाषण झाले.