Kishori Pednekar : "मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार, आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 12:49 PM2022-08-26T12:49:49+5:302022-08-26T12:58:26+5:30
Shivsena Kishori Pednekar : "आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."
मुंबई - मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार असं माजी महापौर किशोरी पेडणेकर (Shivsena Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे. तसेच "आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपामध्ये जे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात त्यांचं काय होतं हे आपण पाहिलेला आहे" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. पेडणेकर यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावरही निशाणा साधला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी "आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही" असं म्हटलं आहे. यासोबतच "मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी पण हे विसरू नये की २५ मधील २० वर्ष ते आमच्या सोबतच होते स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार होतो असं ते म्हणतात मग यशवंत जाधवांना सोबत का घेतलं?" अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.
"नितेश राणे रात्रीचे पत्र लिहितात का?"
"भरत गोगावले तुम्हाला आठ माळ्यावरच्या मातोश्रीवर कोणी बोलावलं नाही आणि तुम्ही येऊ ही नका. भाजपामध्ये जे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात त्यांचं काय होतं हे आपण पाहिलेला आहे. आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत" असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसेच "नितेश राणे रात्रीचे पत्र लिहितात का? स्वतःच्या बापाचे ऐकत नाही. भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली मग भ्रष्टाचार काय धुवून गेला की काय?" असा सवालही त्यांनी विचारला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.