- मनोहर कुंभेजकर, मुंबईयेत्या रविवारी (दि. २७) विधान परिषदेची महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे ७५ नगरसेवक आहेत. शिवसेनेने या नगरसेवकांना अज्ञातस्थळी म्हणजे मालाड (प.) येथील रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवले आहे. मुंबईतील गुलाबी थंडीसह मढच्या ताज्या माशांचा आणि चुलीवरील तांदळाच्या भाकरीचा आस्वाद हे नगरसेवक घेत असल्याचे समजते. विशेष म्हणजे या हॉटेलात खास कोळी बांधवांकडून त्यांची ही व्यवस्था केली जात आहे. शिवसेनेतर्फे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम विधान परिषदेच्या निवडणुकीला उभे आहेत. काँग्रेसतर्फे भाई जगताप आणि अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड या तिघा उमेदवारांमध्ये विधान परिषदेच्या आमदारकीच्या दोन जागांसाठी महत्त्वपूर्ण लढत आहे.या निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोणताही दगाफटका करू नये, म्हणून त्यांना पक्षाने मालाडच्या रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवले आहे. नगरसेवकांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी मुंबईतील सेनेच्या विविध विभागप्रमुखांवर देण्यात आली आहे. रोजच्या धावपळीचा दिनक्रम असलेल्या नगरसेवकांनी आज ख्रिसमसचा मनसोक्त आनंद लुटला. उद्यादेखील रिट्रिट हॉटेलचा पाहुणचार शिवसेनेचे नगरसेवक घेणार आहेत.
शिवसेनेच्या ७५ नगरसेवकांची चंगळ
By admin | Published: December 26, 2015 3:12 AM