शिवसेनेची आक्रमकता भाजपाला डोकेदुखी

By admin | Published: April 16, 2015 02:20 AM2015-04-16T02:20:04+5:302015-04-16T02:20:04+5:30

सहानुभूती आणि कट्टर विरोधक नारायण राणे यांच्याबाबतची चीड या त्रिवेणी संगमातून शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांना घसघशीत मताधिक्य प्राप्त झाले.

Shivsena's aggression is a headache for the BJP | शिवसेनेची आक्रमकता भाजपाला डोकेदुखी

शिवसेनेची आक्रमकता भाजपाला डोकेदुखी

Next

संदीप प्रधान - मुंबई
वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मजबूत संघटन, बाळा सावंत यांच्या निधनामुळे असलेली सहानुभूती आणि कट्टर विरोधक नारायण राणे यांच्याबाबतची चीड या त्रिवेणी संगमातून शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांना घसघशीत मताधिक्य प्राप्त झाले. मात्र यामुळे आता शिवसेना अधिक आक्रमक होईल आणि ‘वांद्रे तो झाकी है मुंबई महापालिका बाकी है,’ असा नारा देत निवडणुकीत उतरेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, स्वतंत्र विदर्भ यासारख्या काही मुद्द्यांवर भाजपा व शिवसेना यांच्या परस्परविरोधी भूमिका आहेत. सध्या राज्यातील सत्तेत सहभागी होऊनही शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. वांद्रे येथील विजय शिवसेनेची ही आक्रमकता
अधिक वाढवू शकतो, अशी भीती भाजपा वर्तुळात व्यक्त होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईकरिता तरतूद न केल्याने अलीकडेच शिवसेनेने त्यास विरोध केला. त्यावेळी मुंबईवर वरचष्मा कुणाचा यावरून भाजपा व शिवसेना यांच्यात वाद झाला होता.
भाजपाचे मुंबईत १५ तर शिवसेनेचे १४ आमदार विजयी झाले असल्याकडे भाजपाने लक्ष वेधले होते. वांद्रे निकालानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीत निम्म्या जागा द्या, असा आग्रह भाजपाने धरला तरी शिवसेना तो मान्य करील किंवा कसे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
वांद्रे (पूर्व) मतदारसंघातून शिवसेनेच्या अनिल परब यांना रिंगणात उतरवावे की बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांना, याबाबत शिवसेनेत सुरुवातीला मतभेद होते. खुद्द अनिल परब यांनी उमेदवारीला नकार देत निवडणुकीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. नारायण राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्गातील पोटनिवडणूक २००५ मध्ये शिवसेनेने लढवली, तेव्हा सर्व भागातील नेते प्रचारात उतरवून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळी शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचा गाजावाजा केला नाही. प्रत्येक गटप्रमुखांवर ४०० मतदारांची जबाबदारी सोपवली होती. महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने शिवसैनिक कामाला लागला होताच त्यात राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याने अधिक एकवटला.

नारायण राणेंचे भवितव्य
आता काँग्रेसच्या हाती !
पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याने आणि खुद्द नारायण राणेंना विधानसभेत दाखल होण्याची आस लागली असल्याने त्यांनी निवडणूक लढवली. याही निवडणुकीत ते पराभूत झाले. राणे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणता निर्णय घ्यायचा ते काँग्रेस पक्षश्रेष्ठींना ठरवावे लागेल.

राष्ट्रवादी सध्या विरोधी बाकांवर बसत असली तरी भाजपाचे व सेनेचे भविष्यात फाटले तर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होऊ शकते. अशावेळी काँग्रेसलाच महाराष्ट्रात प्रमुख, विरोधी पक्षाची भूमिका वठवावी लागेल.

नारायण राणे हेच काँग्रेसला आक्रमक चेहरा देऊ शकतात. यापूर्वीच्या युती सरकारच्या काळात वैयक्तिक संघर्षामुळे जी भूमिका छगन भुजबळ यांनी बजावली ती राणे वठवू शकतात. आता तशी संधी त्यांना दिली जाणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रत्यक्ष निकालाची आकडेवारी पाहिली तर तृप्ती सावंत यांना सहानुभूतीचा लाभ मिळाला आहे. एमआयएममुळे राणे यांना अपशकुन झाला, असे म्हणायची संधी नाही. इतक्या भक्कम मताधिक्क्याने सावंत विजयी झाल्या आहेत. मागील निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढल्याने कुणाचे सरकार येणार याबाबत चित्र धूसर असल्याने येथील मुस्लीम मतदार ओवेसी बंधूंच्यामागे उभा राहिला.

भाजपा-सेनेचे सरकार आहे हे पाहिल्यावर मुस्लिमांची लक्षणीय मते शिवसेनेला गेली तर एमआयएमला मत देणे म्हणजे मत फुकट घालवणे हा राणे यांचा प्रचार पटल्याने काही काँग्रेसकडे वळली.

मुस्लीम समाजातील तरुणांना विकास हवा असल्याने केवळ विखारी भाषणे करणाऱ्या ओवेसी बंधूंच्या पारड्यात मते न टाकता सत्ताधारी पक्षाची साथ करण्याचा विचार काहींनी केला आहे.

औरंगाबाद पालिका निवडणुकीत एमआयएमच्या दोन गटांतील हाणामारी हा पक्ष झुंडीच्या मानसिकतेत गुरफटल्याचे काही अंशी मुस्लिमांना पटू लागले आहे. परिणामी एमआयएमच्या मतांमध्ये घट झाली.

Web Title: Shivsena's aggression is a headache for the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.