शिवसेनेची ३८ जणांची यादी ‘मातोश्री’वर

By Admin | Published: October 26, 2016 10:47 PM2016-10-26T22:47:11+5:302016-10-26T22:47:11+5:30

नगरपालिका निवडणूक : बबन साळगावकरांच्या भूमिकेवर सर्व पक्षांचे लक्ष

Shivsena's list of 38 people on 'Matoshree' | शिवसेनेची ३८ जणांची यादी ‘मातोश्री’वर

शिवसेनेची ३८ जणांची यादी ‘मातोश्री’वर

googlenewsNext

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी निवडणुकीची उत्सुकता वाढत आहे. सर्वच पक्ष नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, साळगावकर यांनी अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. दरम्यान, शिवसेनेची ३८ जणांची यादी ‘मातोश्री’वर पाठविण्यात आली आहे. ही यादी दोन दिवसांपूर्वीच विद्यमान उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्याकडे दिली.
सावंतवाडी नगरपालिकेवर पूर्ण राज्याचे लक्ष आहे. पालिका लढाई ही विद्यमान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातच खऱ्या अर्थाने होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष नगराध्यक्षपदासाठी कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, अ‍ॅड. नीलिमा गावडे, संदीप कुडतरकर, राजू मसुरकर व अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी काँग्रेसकडे अर्ज दाखल केले आहेत. यातील कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस नेते नारायण राणे घेणार आहेत. त्यामुळे सर्वचजण शांत आहेत, तर शिवसेनेत अद्यापपर्यंत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कोणही स्वत:हून पुढे आले नाही किंवा पक्षाकडे अर्ज दाखल केला नाही. शिवसेना कोणाला देईल त्याला देईल, असेच सर्वांचे मत आहे. तरीही विद्यमान उपनगराध्यक्ष राजन पोकळे
यांनी नगराध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे पक्षाकडे कळविले आहे.
विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अद्यापपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. सर्वच पक्षांनी साळगावकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनीही साळगावकर यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले, पण त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवल्याने इतर पक्षांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)


विद्यमान नगरसेवकांना यादीतून डावलले
सावंतवाडी नगरपालिकेत नगरसेवकपदासाठी शिवसेनेकडे बरेच पदाधिकारी इच्छुक आहेत. तसे अर्जही पक्षाकडे केले आहे. या इच्छुकांतील प्रभागवार नावांची यादी विद्यमान उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्याकडे दिली असून, ते ही यादी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहेत. इच्छुकांच्या यादीतून मात्र मातब्बर उमेदवारांना डावलण्यात आले असून, यात विद्यमान काही नगरसेवकांचाही समोवश आहे.


इच्छुकांचे भवितव्य युतीवर अवलंबून
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असली, तरी शिवसेना-भाजपमध्ये युतीवर अद्यापपर्यंत शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील इच्छुकांचे भवितव्य युतीवर अवलंबून आहे. सावंतवाडीत काही प्रभागांत तर शिवसेनेबरोबरच भाजपचे काही उमेदवार दावा ठोकून आहेत.

Web Title: Shivsena's list of 38 people on 'Matoshree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.