मुंबई : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशात मोलाची भूमिका बजावणारे राजकीय पंडित आणि जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी मंगळवारी 'मातोश्री'वर शिवसेनेच्या खासदार, आमदारांना मार्गदर्शन केले. प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याचे संकेत दिसत आहे.
'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची चर्चा केली. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार आणि युवासेना कार्यकारिणीसोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत हेमंत गोडसे, गजानन कीर्तिकर, शिवाजी आढळराव पाटील, चंद्रकांत खैरै, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, अनंत गीते, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत रामदास कदम, संजय राठोड, निलम गोऱ्हेही उपस्थित होते.
दरम्यान, प्रशांत किशोर हे घटकपक्षातील महत्त्वाचे सदस्य आहेत, जदयूचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची ही केवळ सदिच्छा भेट होती. राजकीय भेट नव्हती. युतीची चर्चा सुरू नाही. युतीसाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही. आगामी लोकसभा निवडणुकांची रणनिती आणि समीकरणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवत आहेत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्याच मास्टर माईंडने पंतप्रधान मोदींच्या यशात मोलाची भूमिका बजावली होती. नरेंद्र मोदींना राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचवण्यात प्रशांत किशोर यांचा महत्त्वाचा रोल होता. त्यांना नरेंद्र मोदींचे चाणक्य अशी नवी ओळख प्रशांत किशोर यांना मिळाली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची साथ सोडून, नितीश कुमार यांना साथ दिली. प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या प्रचार-प्रसाराची धुरा हाती घेतली होती. प्रशांत किशोर यांनी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून, त्यांनी नितीश कुमार यांची सत्ता टिकवून ठेवली. प्रशांत किशोर हे रणनीतीचे सौदागर म्हणून ओळखले जातात. बिहारच्या निवडणुकीनिमित्त त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश करत उपाध्यक्षपद भूषवले.