नव्या ‘डीपी’ला शिवसेनेचा विरोध

By admin | Published: May 25, 2016 03:54 AM2016-05-25T03:54:41+5:302016-05-25T03:54:41+5:30

परवडणाऱ्या घरांसाठी ना विकास क्षेत्रातील मोकळ्या जमिनी, मिठागराची जागा व आरे कॉलनीतील भूखंडाचा वापर करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे़ व्यावसायिक चटईक्षेत्र

Shivsena's opposition to the new 'DP' | नव्या ‘डीपी’ला शिवसेनेचा विरोध

नव्या ‘डीपी’ला शिवसेनेचा विरोध

Next

मुंबई : परवडणाऱ्या घरांसाठी ना विकास क्षेत्रातील मोकळ्या जमिनी, मिठागराची जागा व आरे कॉलनीतील भूखंडाचा वापर करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे़ व्यावसायिक चटईक्षेत्र निर्देशांकातील प्रस्तावित वाढीवरूनही शिवसेनेने भाजपाला आव्हान दिले आहे़ त्यामुळे मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून सत्ताधारी युतीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात आखाड्यात उतरल्याचे चित्र आहे.
शहराचा सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठीचा विकास नियोजन आराखडा वादात सापडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार नवीन आराखड्याची आखणीही अंतिम टप्प्यात असताना आता सत्ताधारी शिवसेनेनेच यातील काही तरतुदींना विरोध सुरू केला आहे़ त्यामुळे विकास आराखड्यावरून शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगणार आहे.
विकास आराखड्यातून ना विकास क्षेत्राचा काही भाग गृहनिर्माणासाठी खुला करण्यात आल्याने शिवसेनेचे पर्यावरण प्रेमही जागे झाले आहे़ अशा तरतुदींना विरोध करण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली़ या आराखड्यात काही बदलही शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी सुचविले़
हा नवीन आराखडा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने तयार केला़ तरी यावर भाजपाची छाप असल्याचे बोलले जाते़ त्यात ऐन निवडणुकीच्या काळात विकास आराखड्यातून दहा लाख परवडणाऱ्या घर बांधण्याची योजना पालिकेने जाहीर केली आहे़ मात्र विकास आराखड्यातील काही तरतुदींमुळे मुंबईकरांच्या विकासाला बाधा निर्माण होईल, अशी भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)

महालक्ष्मी रेसकोर्सवर हवे मध्यवर्ती उद्यान
महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेऊन तेथे सार्वजनिक उद्यान व विरंगुळा क्षेत्र निर्माण करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे़

आरे कारशेडला विरोध
गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी जागा देण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला आहे़ या प्रकल्पावरून शिवसेना भाजपा आमने सामने आहेत़ त्यामुळे पालिकेने सावध भूमिका घेऊन राज्य सरकारने जागा दिल्यास कारशेडसाठी जागा प्रस्तावित केली आहे़ मात्र मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनी नकोच, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे़

वाढीव एफएसआयला विरोध
उद्योग, वाणिज्यिक वापर, तारांकित हॉटेल, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, म्हाडा, परवडणारी घरे यासाठी चटईक्षेत्र निर्देशांक पाचपर्यंत वाढविणे प्रस्तावित आहे़ त्याचवेळी जुन्या इमारतींसाठी तीन चटईक्षेत्र निर्देशांक ठेवण्यात आला आहे़ या वाढीव एफएसआयला मर्यादा न घातल्यास पायाभूत सुविधांवर ताण असाह्ण होईल, अशी भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे़ वाढीव एफएसआयला सेनेने विरोध दर्शविल्यामुळे सुधारित आराखड्यातील एफएसआयच्या तरतुदीही अडचणीत आल्या आहेत.

Web Title: Shivsena's opposition to the new 'DP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.