मुंबई : भाजपा हा थापाड्यांचा पक्ष, तर शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी; त्यांना कुठून पाहायचे तेच समजत नाही. शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली.विरोधकांच्या भारत बंदला मनसेने पाठिंबा दिला होता, तर शिवसेना बंदमध्ये सहभागी नव्हती. यावरून राज म्हणाले की, शिवसेनेला स्वत:ची भूमिका राहिली नाही. त्यांची पैशाची कामे अडली की, हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि कामे झाली की सत्तेत राहतात. शिवसेनेला मनसेवर आरोप करण्याचा अधिकार नाही. राज यांनी भाजपा, मोदी आणि अमित शहांना टीकेचे लक्ष्य करून म्हणाले की, पेट्रोल डिझेलच्या भावाने उच्चांक गाठलाय, रुपयाने नीचांक गाठलाय आणि तरीही त्याची भाजपाला लाज वाटत नाही. निवडणुका जिंकायच्या त्यातून पैसे कमवायचे आणि पुन्हा निवडणुका जिंकायच्या हाच भाजपाचा जाहीरनामा आहे. हा थापाड्यांचा पक्ष आहे, देशाचा राजा जनता असावी, व्यापारी नसावा अशा शब्दात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला लक्ष्य केले.
शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी तर भाजपा थापाड्यांचा पक्ष - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 4:45 AM