शिवसेनेची भिस्त ठाकरेंच्या सभांवर
By admin | Published: April 11, 2015 01:32 AM2015-04-11T01:32:19+5:302015-04-11T01:32:19+5:30
जागा वाटपातील गोंधळ, बंडखोरी आणि नाराजांच्या बंडामुळे हैराण झालेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना शिवसैनिकांच्या टीकेचे धनी व्हावे
नवी मुंबई : जागा वाटपातील गोंधळ, बंडखोरी आणि नाराजांच्या बंडामुळे हैराण झालेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना शिवसैनिकांच्या टीकेचे धनी व्हावे लागल्याने भेदरलेल्या शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा आसरा घेतला आहे. यासाठी त्यांनी नवी मुंबईत प्रथमच पक्षाच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या तीन सभा घेण्याचे निश्चित केले आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला घेरण्यासाठी ठाकरेंच्या सभा घेण्यात येणार असल्याचे पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांनी स्पष्ट केले असले तरी यातून स्थानिक नेत्यांचा आत्मविश्वास डळमळल्याचे दिसून येत असल्याचे शिवसैनिकांचे मत आहे.
जागा वाटपात भाजपाला शिवसेनेच्या हक्काच्या ४३ जागा गेल्या आहेत, तर वाट्याला आलेल्या ६८ जागांपैकी काही ठिकाणी काँगे्रसशी छुपा समझोता केल्याच्या चर्चेमुळे व अनेक जागा आयारामांना दिल्याने पक्षातील असंतोष उफाळून आला आहे. सुमारे ४० च्यावर प्रभागात बंडखोरी झाली आहे. ती थोडीफार शमविण्यास पालकमंत्री एकनाथ शिंदेंना यश आले असले तरी शिवसैनिकांतील आत्मविश्वास चेतवण्याची हिंमत एकाही नेत्यात नसल्याने थेट ठाकरेंनाच तीन वेळा निवडणूक प्रचारात उतरवण्याची पाळी स्थानिक नेत्यांवर आली आहे. (खास प्रतिनिधी)