शिवसेनेच्या उलट्या बोंबा

By admin | Published: July 8, 2016 01:43 AM2016-07-08T01:43:40+5:302016-07-08T01:43:40+5:30

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने आज यूटर्न घेत काळ्या यादीतील ठेकेदारांना पुलांचे कंत्राट दिल्याप्रकरणी प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले़

Shivsena's vomiting | शिवसेनेच्या उलट्या बोंबा

शिवसेनेच्या उलट्या बोंबा

Next

मुंबई : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने आज यूटर्न घेत काळ्या यादीतील ठेकेदारांना पुलांचे कंत्राट दिल्याप्रकरणी प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले़ घोटाळेबाज ठेकेदारांवर कारवाई सुरू असतानाच चार पुलांचे काम स्थायी समितीने त्यांना दिले़ मात्र या ठेकेदारांची शिफारस आलीच कशी, अशा उलट्या बोंबा मारण्यास शिवसेनेने आता सुरुवात केली आहे़
३४ रस्त्यांची तपासणी केली असता या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली़ ३५२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी थर्ड पार्टी आॅडिट कंपनी आणि सहा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू झाली़ तरीही घोटाळेबाज सहा ठेकेदारांना यादरम्यान चार पुलांचे कंत्राट मिळाले़
हे प्रकरण न्यायालयात पोहोचले़ याची गंभीर दखल घेत न्यायालयाने पालिका प्रशासनाबरोबरच स्थायी समितीलाही चांगलेच झापले़ घोटाळा उघड केल्याचे श्रेय यापूर्वीच भाजपा घेऊन झाल्याने शिवसेनाच यामुळे अडचणीत येणार आहे़ याचा साक्षात्कार झाल्याने काळ्या यादीतील ठेकेदारांना कंत्राट मिळतेच कसे, असा सवाल सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिकेच्या महासभेत आज केला़ (प्रतिनिधी)

३५२ कोटी
रुपयांचा घोटाळा
साडेसात हजार कोटी रुपये खर्च करून काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत़ मात्र ३४ रस्त्यांच्या चौकशीत सरासरी ३८ ते १०० टक्के अनियमितता आढळून आली़ असा ठपकाच पालिकेच्या चौकशी समितीने ठेवला़ सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे़ २०१३ ते २०१५मध्ये दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशी यात होणार आहे़

या ठेकेदारांची मक्तेदारी : चौकशीच्या पहिल्या टप्प्यात दोषी ठरलेले ठेकेदार के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन यांना काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र यातील काहींना पुलाचे कंत्राट तर जे़ कुमारला मेट्रो प्रकल्प ३चे कंत्राट मिळाले आहे़

या पुलांचे काम रखडले : हँकॉक पूल, मिठी नदीवरील पूल, यारी रोडच्या जंक्शनवर वाहतूक पूल, लोखंडवाला कॉम्प्लेक्समागचे रस्ता रुंदीकरण आणि विक्रोळी रेल्वे स्टेशनपासून आरओबीचे कंत्राट देण्यात आले. या कामासाठी आता नव्याने निविदा मागविण्यात
येणार आहेत.

विरोधकांचा सभात्याग
घोटाळेबाज ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना मुंबईतील चार पुलांच्या बांधकामांचे कंत्राट तयार होत होते़ त्यामुळे ही प्रक्रिया दोन महिने लांबणीवर टाकत पुलांचे कंत्राट मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते़ याबाबत विरोधी पक्षांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांना आज जाब विचारला़ मात्र त्यांनी कोणतेही ठोस उत्तर न दिल्यामुळे विरोधी पक्षांनी सभा तहकुबी मांडली़ यास सत्ताधाऱ्यांनी विरोध केल्यामुळे विरोधी पक्षांनी सभात्याग केला़

सत्ताधाऱ्यांना घेरले : रस्ते घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना आज घेरले़ काँग्रेसच्या नगरसेवकांनी मोठमोठे फलक झळकवून घोषणाबाजी केली. सेना- भाजपा भ्रष्टाचाराची युती, शिवसेनेमुळे मुंबई खड्ड्यात अशी निदर्शने करण्यात आली़

सावध भूमिका : रस्ते घोटाळा प्रकरणात दक्षता खात्याचे उदय मुरुडकर आणि रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे, असे आयुक्तांनी पालिका महासभेपुढे स्पष्ट केले़ मात्र त्यांनी ठेकेदारांवरील कारवाईबद्दल बोलणे टाळले़

Web Title: Shivsena's vomiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.