‘शिवनेरी’च्या बचावासाठी ‘शिवशाही’अलिबागला! मुंबई-अलिबाग वातानुकूलित सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:39 AM2017-09-26T02:39:50+5:302017-09-26T02:40:05+5:30
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली वातानुकूलित शिवशाही एसटी सेवा सोमवारपासून मुंबई-अलिबाग मार्गावर सुरू झाली. आठ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू राहणार आहे.
मुंबई : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली वातानुकूलित शिवशाही एसटी सेवा सोमवारपासून मुंबई-अलिबाग मार्गावर सुरू झाली. आठ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू राहणार आहे.
खासगी बसला टक्कर देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाहीची निर्मिती केली. मुंबई-पुणे मार्गावरील शिवशाही सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. मात्र, या मार्गावर वातानुकूलित शिवनेरी सेवा सुरू आहे. परिणामी, महामंडळाने ८ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-अलिबाग सेवा सुरू केली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या मार्गावरील सेवा कायम ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एसटीतील सुत्रांनी दिली.
ही बस मुंबई सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता अलिबागसाठी सुटेल, तर परतीचा प्रवास दुपारी १२ वाजता सुरू होईल. मुंबई-अलिबाग प्रवासासाठी १६९ रुपये तिकीट आहे, तर रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर देखील ‘शिवशाही’ सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी येथून सकाळी ९.३० वाजता ही बस सुटणार आहे. तर कोल्हापूरवरून रत्नागिरीसाठी दुपारी २.४५ वाजता बस मार्गस्थ होईल. रत्नागिरी-कोल्हापूर शिवशाहीसाठी प्रवाशांना २२७ रुपये मोजावे लागणार आहे.